पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दीड वर्षापासून बंद असलेली शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. आजपासून शाळा सुरू झाल्याने पुणे शहरातील काही शाळांनी मुलांचे औक्षण करून तर काहींनी चॉकलेट देऊन स्वागत केले. असे असताना पुण्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शाळेची फी न भरल्यामुळे पहिल्या दिवशी शाळेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील सिंहगड रोडवरील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडली. त्यामुळे शाळेबाहेर पालकवर्ग आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
कोरोनामुळे बहुतांश जणांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे अनेकांना शाळेच्या फी भरता आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत शाळांकडून गेल्या अनेक दिवसांपासून फी भरण्याची सातत्याने मागणी होत आहे. मात्र, हातालाच काम नसल्यामुळे फी भरणार तरी कुठून? असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे, असे असतानाही शाळेकढून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना बाहेर काढले जात आहे. गेल्या दीड वर्षापासून शहरात फी माफीसाठी आणि सवलत मिळावी यासाठी अनेक आंदोलने झाली. मात्र, काही शाळांच्या माध्यमातून तर ऑनलाईन शाळा बंद करणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे, असेच प्रकार पाहायला मिळाले. आम्ही फी भरणार आहोत. मात्र, शाळेने काहीतरी सवलत दिली पाहिजे. अशापद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पालकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -शाळा सुरु करण्याचा निर्णय आव्हानात्मक; मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद