मुंबई - घरात आपल्या जन्मदात्या बापाचा पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला मृतदेह आणि त्याच दिवशी दहावी बोर्डाची परीक्षा होती. तो द्विधा मनस्थितीत होता. मात्र, त्याने त्याच्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर पेलत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंत्यसंस्कार थांबवून परीक्षा देणे पसंत केले आणि आज निकाल पाहून डोळ्यात पाणी आले. त्याने ५३.२० टक्के गुणे मिळवत दहावीत यश मिळाले.
घरात वडिलांचा मृतदेह असतानाही 'त्याने' दिला पेपर, आज निकाल पाहून आले डोळ्यात पाणी चेंबूरच्या टिळकनगर विभागातील पंचशील नगरमध्ये राहणारे परमेश्वर साळवे यांचे 2 मार्चला अल्प आजाराने निधन झाले होते. आपल्या आईवडील, पत्नी आणि दोन मुलांसह राहणारे परमेश्वर यांच्या अकाली निधनाने साळवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातच परमेश्वर साळवे यांचा मुलगा संदेश साळवे याचा दहावीचा पेपरही त्यादिवशीच असल्याने वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि दहावीचा पेपर या भयंकर प्रश्नानी संदेश हवालदील झाला होता. अशावेळी खचून न जाता घरात दुःखाचा डोंगर कोसळले असताना मी दहावीचा पेपर देवून येतो. नंतर वडिलांचं अंत्यस्कार करूया, असे संदेशने आजोबा आणि सर्व नातेवाईकांना सांगितले.
आजोबा आणि त्याच्या नातेवाईकांनी हे ऐकले आणि अंत्यसंस्कारसाठी आलेल्या नातेवाईकांनी संदेशच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य देत संदेश परिक्षेवरून आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. संदेश पेपरला गेला आणि पेपर देऊन आल्यानंतर त्याच्या वडिलांचे विधीवत अंत्यस्कार करण्यात आले. त्याच संदेशने आज दहावीच्या परीक्षेत यश संपादन करून ५३.२० टक्के गुण मिळवले आहेत. वडिलांनी पाहिलेले स्वप्न आणि नातेवाईकांनी दिलेले मानसिक बळ, यामुळेच आज मी हे यश संपादन करू शकलो असून पुढे मला पोलीस व्हायचंय असे संदेशने सांगितले.
मदतीचा हात हवा -
संदेशच्या वडिलांच्या निधनानंतर घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. आई दुसऱ्याच्या घरातील कामे करते. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. यंदाच्या लॉकडाऊनमुळे साळवे कुटुंबाची परिस्थिती आणखीन खालावली असून संदेशच्या पुढील शिक्षणासाठी घरच्यांची परिस्थिती नाही. त्यामुळे संदेशला मदतीचा हात हवा आहे. त्याच्या पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करा, असे आवाहन चेंबूरचे वंचित बहुजन आघाडीचे शशिकांत मोरे यांनी केले आहे.