मुंबई -राज्यात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण वाढत असल्याने धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ मेपर्यंत कडक निर्बंध वाढवल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासंदर्भातील अद्यादेश काढले असून आपत्कालीन कायद्यातंर्गत सरकारने १ मे सकाळी ७ वाजल्यापासून ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू असणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता निर्णय -
कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी राज्यात २२ एप्रिलपासून १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्याची शक्यता होती. मात्र, राज्यातील काही शहरे वगळता कोरोनाचा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अखेर कडक निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. याला सर्व मंत्र्यांनी संमती दिली होती. त्यानुसार या निर्णयावरती शिक्कामोर्तब करण्यात आला असून त्यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. सध्या लागू असलेले निर्बंध हे येत्या १५ मेपर्यंत कायम असणार आहेत.
हे राहणार सुरू -
राज्यात आता सर्व किराणा, भाज्यांची दुकाने, फळ विक्रेते, डेरी, बेकरी, सर्व प्रकारची खाद्य दुकाने (चिकन, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी) कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व दुकाने आणि शेती संबंधिची दुकाने, पाळीव प्राण्याची खाद्य दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ अशा केवळ चार तास सुरू ठेवता येणार आहेत. वरील सर्व दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाला संबंधित क्षेत्रातील परिस्थिती पाहून दुकांच्या वेळांबाबत निर्णय घेता येणार आहे.
हे राहणार बंद -
राज्यात १५ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असलेले कडक निर्बंध हे कायम असणार आहेत. या दरम्यान राज्यातील सर्व सलून, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील. तसेच शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद राहतील. क्रीडा संकुलं आणि स्टेडियमसह धार्मिक स्थळेदेखील बंद राहतील. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांनादेखील परवानगी देण्यात आलेली नाही. त्यांचबरोबर विवाहासाठी केवळ २५ जणांना उपस्थितीला परवानगी आहे. अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
हेही वाचा - केंद्राकडून मिळाला लशींचा मोजकाच साठा; मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण बंद