महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदिवासी मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई - दिपक केसरकर - दिपक केसरकर

राज्यातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात लैंगिक अत्याचार प्रकरणी जे संस्थाचालक, शिक्षक व कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

आदिवासी मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई - दिपक केसरकर

By

Published : Jun 19, 2019, 7:13 PM IST

मुंबई- राज्यातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात लैंगिक अत्याचार प्रकरणी जे संस्थाचालक, शिक्षक व कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी सदस्य रामदास आंबटकर, शिक्षक आमदार नागो गाणार यांनी याविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील इन्फंट जिजस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वसतीगृहातील एकूण 16 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना 9 ते 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, राज्यात आदिवासी मुलींच्या वसतीगृहात होणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रकार रोखण्यासाठी स्थानिक व राज्य दक्षता समितीमार्फत उपाययोजना केल्या जातील, असे केसरकर यांनी सांगितले.

ज्या स्थानिक ठिकाणी दक्षता समित्या नसतील तेथे दक्षता समित्यांची स्थापना केली जाईल. तसेच महिला वसतीगृहांवर महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. या समस्यांवर उपाययोजना आखण्यासाठी सर्व सदस्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी केसरकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details