मुंबई - जर तुम्ही रस्त्यावर विक्री करण्यात येणारे खाद्यपदार्थ खात असाल, तर सावधान. ते तुमच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. कारण, असे रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांचे एक एक गलिच्छ प्रकार समोर येत आहेत. कुर्ला स्थानकातील अस्वच्छ लिंबू सरबत विक्रीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका गलिच्छ इडलीवाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेर इडलीवडा विक्रेत्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत विक्रेता इडली वड्याच्या चटणीत टाकण्यासाठी आणि ग्राहकांना पिण्यासाठी लागणारे पाणी जवळील शौचालयातील नळाचे भरत होता. इडली विकत असताना शेजारील रेल्वेस्थानकाच्या जवळ असणाऱ्या शौचालयाचे पाणी वापरतानाचा हा व्हिडिओ कोणी एका जागरुक ग्राहकाने कॅमेऱयात कैद केला आहे. त्याला संबंधित व्हिडिओतील ग्राहकाने जाब विचारला असता त्याने ते पाणी फेकून दिले.