मुंबई - बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मात्र, तेथील काही स्थानिक लोकांनी आणि तथाकथित प्रादेशिक अस्मिता मिरवणाऱ्या संघटनांनी या प्रतिष्ठापणेला विरोध केला. यानंतर कर्नाटक प्रशासनानेसुद्धा त्यांचीच बाजू घेत शुक्रवारी रात्री रातोरात हा अश्वारूढ पुतळा हटवला. याघटनेनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये या घटनेचा निषेध नोंदविण्यात येत आहे.
मीरा भाईंदरमध्ये शिवसैनिकांकडून निषेध..!
मीरा भाईंदर(ठाणे) - मीरा भाईंदर शिवसेनेनच्यावतीने काशीमीरा जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
कर्नाटक सरकारने जाणीवपूर्वक सूडबुद्धीने महाराजांचा पुतळा हटवला आहे. लवकरात-लवकर पुतळा ज्या ठिकाणी होता तिथे बसवण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांनी दिली. यावेळी महिला जिल्हाप्रमुख स्नेहल सावंत, नगरसेविका तारा घरत, स्नेहा पांडे, प्रवक्ते शैलेश पांडे तसेच आराध्य सामंत, सलमान हाशमी, पप्पू भिसे, धनेश पाटील इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
----------------------
उल्हासनगरमध्ये शिवसैनिकांचे जोडे मारो आंदोलन
ठाणे - कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या प्रतिमेला जोडे मारून उल्हासनगरमधील शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी कर्नाटक सरकाच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे याआधीदेखील अभ्यासक्रमातून ‘शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास वगळण्यात आला’ अशा आशयाचा मजकूर लिहलेले बॅनर यावेळी शिवसैनिकांनी हातात घेत कर्नाटक सरकारच्या या मराठी द्वेषाचा निषेध केला.
या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहर प्रमुख राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड, नगरसेवक शेखर यादव, युवा अध्यक्ष बाळा श्रीखंडे, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक आदी उपस्थित होते. दरम्यान, या सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उल्हासनगर शहर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
---------------
जालन्यात कर्नाटक सरकारचा शिवसेनेकडून निषेध
जालना - बेळगावातील त्या घटनेचे जालना जिल्ह्यामध्येही पडसाद उमटले आहेत. शहर शिवसेनेच्या वतीने गांधीचमन परिसरात आज दुपारी घोषणाबाजी करून या घटनेचा निषेध केला.
शिवसेनेचे शहराध्यक्ष विष्णू पाचफुले ,बाला परदेशी, विजय पवार, नितीन जांगडे, संतोष सलामपुरे, राम भुतेकर, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले आदी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गांधीचमन परिसरात एकत्र येत कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. तसेच पुतळा पुन्हा त्या जागेवर बसवण्याची मागणी करण्यात आली.