महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्र सरकारच्या 'जेईई-नीट'च्या भूमिकेविरोधात उद्या काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन - मुंबई कोरोना बातमी

कोरोनाचे संकट अजूनही संपले नाही.तरीही केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. सरकारच्या या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थी व पालकांचे आरोग्य धोक्यात येऊन कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती आहे. यामुळे याविरोधात काँग्रेसकडून उद्या (शुक्रावार) राज्य आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

thorat
बाळासाहेब थोरात

By

Published : Aug 27, 2020, 6:41 PM IST

मुंबई -कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भुमिकेला विरोध करत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेसकडून शुक्रवारी (दि. 28 ऑगस्ट) राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्याच्या हट्टामुळे केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोठ्या संकटात ढकलत आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असताना परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा देण्यास लाखो विद्यार्थ्यांना सक्ती करणे म्हणजे या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही अजून झालेली नाही. जेईई परिक्षेसाठी तब्बल साडेआठ लाख विद्यार्थी बसलेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देण्यास एकत्र आल्यास कोरोना संक्रमणाची भीती नाकारता येत नाही.

एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे बिहार, आसाममध्ये गंभीर पुरस्थिती आहे, अशावेळी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास भाग पाडून त्यांच्यावर मानसिक दडपण आणण्याचा हा प्रकार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या कालच्या बैठकीतही या परीक्षा घेण्यास विरोध करण्यात आला असून केंद्र सरकारच्या परीक्षा घेण्याच्या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. खासदार राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या आरोग्य व भविष्याची चिंता व्यक्त करत या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली आहे.

परीक्षेविरोधात एसएसयुआयनेही केंद्र सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिलेला आहे. प्रदेश काँग्रेसही केंद्र सरकारच्या या मनमानी व हटवादी भुमिकेच्या विरोधात शुक्रवारी (28 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता सर्व जिल्ह्यात केंद्र सरकारच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे मुंबई येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत. आंदोलन करताना सोशल डिस्टन्स पाळावे, मास्क लावावा व कोरोनासंदर्भात सरकारने घालून दिलेल्या सर्व अटी, नियमांचे पालन करावे, असे आवाहनही थोरात यांनी केले आहे.

हेही वाचा -जुन्या उपकरप्राप्त इमारतींना हवा 'स्वयंपुनर्विकासा'चा बूस्टर डोस

ABOUT THE AUTHOR

...view details