मुंबई - जुलै महिन्यात राज्य सरकारला मुद्रांक शुल्क(स्टॅम्प ड्युटी) वसुलीतून 933 कोटी महसूल मिळाला होता. त्यामुळे ऑगस्टमध्ये हा वाढून 1 हजार कोटीच्या वर जाईल असे वाटत होते. मात्र, हा आकडा 1 हजार कोटीच्या आतच अडकला आहे. ऑगस्टमध्ये राज्याला मुद्रांक शुल्क-नोंदणीतून 972 कोटी मिळाले आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये 39 कोटींनी महसूल वाढला आहे. मुंबईतील महसुलात मात्र मोठी घट पाहायला मिळत आहे. जुलैमध्ये मुंबईतून 242 कोटींचा महसूल मिळाला होता, यात ऑगस्ट महिन्यात 31 कोटींची घट झाली आहे.
राज्याला महिन्याला दीड हजार कोटींहून अधिक महसूल हा मुद्रांक शुल्क आणि नोंदणीतून मिळतो. कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका मुद्रांक शुल्क वसुली आणि नोंदणीला बसला आहे. त्यामुळेच एप्रिल ते जूनपर्यंत महसूल खूपच घटला होता. त्यानंतर मात्र महसुलात वाढ होत आहे. पण ही वाढ म्हणावी तितकी समाधानकारक म्हणता येणार नाही. कारण अजूनही महसुलाने 1 हजार कोटींचा आकडा पार केलेला नाही. जुलै असो वा ऑगस्ट महसूल 1 हजार कोटीच्या आतच अडकला आहे. ऑगस्ट महिन्यातील महसुलाची अधिकृत आकडेवारी 'ईटीव्ही भारत' च्या हाती लागली आहे. त्यानुसार 2 लाख 6 हजार 857 दस्ताची नोंदणी राज्यात झाली आहे. यातून 972 कोटीचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे. जुलैमध्ये हा आकडा 933 कोटी इतका होता आणि 1 लाख 88 हजार 49 इतके दस्त नोंदवले गेले होते. ऑगस्टमध्ये बऱ्यापैकी सर्व व्यवहार, क्षेत्र खुले झाले आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये नक्कीच 1 हजार कोटीचा आकडा पार होईल, अशी आशा होती. पण प्रत्यक्षात मात्र तसे घडले नसून या महिन्यात केवळ 39 कोटींचीच वाढ झाली आहे.
लॉकडाऊन अगोदरचा विचार केला तर राज्याला फेब्रुवारी 2020 मध्ये तब्बल 1 हजार 700 कोटींचा महसूल मुद्रांक शुल्क-नोंदणीतून मिळाला होता. यात एप्रिलमध्ये मोठी घट होऊन केवळ 394 कोटीवर महसूल जमा झाला होता. याकाळात केवळ 1 हजार 425 इतक्याच दस्ताची नोंदणी झाली होती. लॉकडाऊनचा व कोरोनाचा मोठा परिणाम महसूल वसुलीवर झाल्याचे दिसून आले. जूनमध्ये यात वाढ होण्यास सुरुवात झाली. कारण महसूल वाढवणे राज्य सरकारसाठी अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे नोंदणी विभागाने ऑनलाइनसह प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबईतील 10 नोंदणी कार्यालये सुरू करत राज्यातील देखील कार्यालये सक्रिय करण्यात आली. परिणामी जूनमध्ये 819 कोटी रुपये तर ऑगस्टमध्ये 972 कोटी रुपये जमा झाले.