मुंबई - शिवसेना-भाजप युतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत "आमचं ठरलंय" असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले तरी, याबाबत पक्षाचे वजनदार नेते चंद्रकांत पाटील यांना काहीही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत निश्चित होईल, असे पाटील यांनी सांगितले. भाजपच्या प्रदेश बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
युतीत काय 'ठरलंय' चंद्रकांत पाटलांना माहीतच नाही, म्हणाले मुख्यमंत्री दिल्लीत ठरेल - शिवसेना-भाजप
आपण पक्षाचा साधा कार्यकर्ता असून मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत होण्याचे संकेत पाटील यांनी दिले असल्याने अजूनही युतीत मुख्यमंत्री पदाचा संभ्रम असल्याचे चित्र समोर आले आहे.
भाजप-शिवसेना युती होणार "आमचं ठरलंय" अशा टॅग लाईनचा उल्लेख करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना युतीच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्रीपद गौण असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात सांगितले. पण युतीचे नेमके काय 'ठरलंय' हे चंद्रकांत पाटील यांना माहीतच नाही. आपण पक्षाचा साधा कार्यकर्ता असून मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत होण्याचे संकेत पाटील यांनी दिले असल्याने अजूनही युतीत मुख्यमंत्री पदाचा संभ्रम असल्याचे चित्र समोर आले आहे.
लोकसभेच्या प्रचंड विजयानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. आता विधानसभेची तयारी सुरू केली असून पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी निर्देश दिल्याप्रमाणे काम सुरू असल्याचे पाटील म्हणाले.
आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. मुख्यमंत्री शिवसेनेचा असेही शिवसैनिकांना वाटते. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आपलाच मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा आहे. पण सध्या केवळ युतीच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सत्तेचा फाॅर्म्युला काय आहे, ते शिवसेनेच्या नेत्यांना माहीत असेल, मला त्या संबंधी माहीत नाही. मला फक्त अमित शाह यांनी सांगितले आहे की, प्रत्येक जागेवर आपला उमेदवार निवडून आला पाहिजे, त्या दृष्टीने भाजप काम करेल असेही त्यांनी सांगितले.