मुंबई - युरोपीय देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर सुरू केला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा उद्रेक अधिक गंभीर आहे. ही लाट आपल्या देशात येत्या काही महिन्यांमध्ये येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने युद्धपातळीवर पूर्वतयारी सुरू केली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात अनेक प्रकारच्या खबरदारी घेण्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोविड रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. परंतु, जागतिक स्तरावरील कोविड उद्रेकाचे अवलोकन केले असता, युरोपमधील अनेक देशांमध्ये कोविड आजाराची दुसरी लाट आलेली आहे. ही लाट आपल्या देशात जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने खबरदारीचे घेण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये प्रयोगशाळा तपासणी आयसीएमआर मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू ठेवण्याची आवश्यकता. करोना उद्रेकाच्या सध्याच्या उतरणीच्या काळातही प्रयोगशाळा सर्वेक्षण सक्षमपणे सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. प्रयोगशाळा सर्वेक्षणामध्ये कोणताही हलगर्जीपणा न करता आय.सी.एम.आर संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संशयित रुग्णांच्या प्रयोगशाळा चाचण्या करण्याची आवश्यकता असल्याचे आदेशात म्हटले आहे.
तसेच, जागतिक आरोग्य संघटनेने दर दिवशी दर दहा लाख लोकसंख्येमागे किमान १४० तपासण्या करण्यात याव्यात. असे आपल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे. त्याचे पालन होणे आवश्यक आहे. या करिता प्रत्येक जिल्हा आणि मनपा क्षेत्रात प्रयोगशाळा चाचणी केंद्रे कार्यान्वित करून त्यांची माहिती विविध माध्यमातून जनतेला देण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालनालयाने दिले आहेत.
फ्ल्यू सदृश्य आजाराचे नियमित सर्वेक्षण
दुसऱ्या लाटेसंदर्भातील सतर्कतेचा इशारा वेळेवर मिळावा यासाठी आपण फ्ल्यू सदृश्य रुग्णांचे सर्व्हेक्षण नियमितपणे करण्याची आवश्यकता आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कार्यरत फिवर क्लिनिक या सर्व्हेक्षणात महत्वाची भूमिका बजावू शकतात. यामुळे एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रम (आय.डी.एस.पी) अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांच्याकडून फ्ल्यू सदृष्य आजार असलेल्या रुग्णांच्या आठवडी अहवालाचे अवलोकन नियमितपणे होऊन, साप्ताहिक ट्रेन्ड समजावून घेणे आवश्यक आहे.
कोविड प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना
याच पद्धतीचे सर्वेक्षण शहरी भागात महानगरपालिका दवाखाने आणि निवडक खाजगी रुग्णालयांमार्फत करण्यात येणे गरजेचे आहे. या विश्लेषणातून ज्या भागातून या स्वरुपाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत, त्या भागांमध्ये कोविड प्रतिबंध व नियंत्रण विषयक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्यात याव्यात, असेही आदेशात म्हटले आहे. तसेच, अधिक प्रमाणात फ्ल्यू सारखे आजार असणारे रुग्ण आढळणाऱ्या भागात प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जनसंपर्क असलेल्यांचे विशेष सर्व्हेक्षण
गृहभेटीद्वारे सर्व्हेक्षण आणि कॉन्टेक्ट ट्रेसिंग अधिक वेगाने व युद्धपातळीवर करण्यात यावे. तसेच, जनसंपर्क अधिक असणाऱ्या व्यक्तींचे विशेष सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने ज्या व्यक्तींचा जनसंपर्क किंवा सामाजिक संपर्क अधिक असतो, अशा व्यक्तींच्या माध्यमातून कोविड आजाराचा प्रसार अधिक वेगाने होतो. हे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे. दुसरी लाट येण्यामध्येही अशा सुपर स्प्रेडर व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे लक्षात घेऊन अशा व्यक्तींचे सर्वेक्षण आणि प्रयोगशाळा तपासणी प्राधान्याने करण्याची आवश्यकता असल्याचे आदेशात म्हटले आहे.