मुंबई - जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४५ जवानांना वीरमरण आले. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवाद्यांना समर्थन देणाऱ्या पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यामुळे देशामध्ये उद्वेग आहे, चीड आहे. सगळ्या नागरिकांची प्रतिक्रिया एकच आहेत. 'आता कोणाला सोडणार नाही', या तोंडी वाफा दवडण्यापेक्षा एकदाच याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. निवडणुका, प्रचार जाऊ द्या बाजूला, आधी पाकिस्थानला जशास तसे उत्तर द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यामुळे देशामध्ये उद्वेग आहे, चीड आहे. सगळ्या नागरिकांची प्रतिक्रिया एकच आहेत. 'आता कोणाला सोडणार नाही', या तोंडाच्या वाफा दवडण्यापेक्षा एकदाच याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. निवडणुका, प्रचार जाऊ द्या बाजूला, आधी पाकिस्थानला जशास तसे उत्तर द्या, या शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सणसणीत टोला लगावला आहे. मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
हा हल्ला गुप्तचर यंत्रणेचा चिंधड्या उडवणारा
ठाकरे यांनी गुप्तचर विभागावरही हल्ला केला. हा हल्ला केवळ दहशतवादी हल्ला नसून गुप्तचर यंत्रणेचा चिंधड्या उडवणारा हल्ला आहे. हल्ल्याबाबत माहिती ही मिळत नसेल तर गुप्तचर यंत्रणा काय करतात, हा प्रश्न आहे. सूत्र यांच्या हातात असून त्यांना कळत नसेल तर त्यांना त्या ठिकाणाहून उठवा. नुसत्या दंड थोपटून काही होत नाही तर सोक्षमोक्ष लावा, असे ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राईक हा आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला होता. मात्र, आता पाकिस्तान घुसावं लागेल. सगळा देश सरकारच्या मागे असून पाकिस्तानला धडा शिकवायची हीच वेळ आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केला असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचण्याची संधी सोडली नाही. या हल्ल्यानंतर बोलताना मोदी यांनी कुणालाही सोडणार नाही, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. सर्जिकल स्ट्राईकच्या ही पुढे जाऊन कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.
युतीबाबतच्या प्रश्नाला उद्धव यांनी दिली बगल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुरुवारी झालेल्या भेटीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उद्धव यांनी बगल दिली. फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि अन्य अनेक प्रश्नावर चर्चा झाली. मात्र, या सगळ्या गोष्टी गौण आहेत. सध्या दहशतवादी हल्ला हा विषय अतिशय गंभीर आहे. युती, निवडणुका हे चालूच राहील. पण पाकिस्तानला सोडू नका,' असे ते म्हणाले.