मुंबई - राज्यातील 5 विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघ, या पाचही जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी संबंधित मतदारसंघात दाखल केला आहे. यावेळी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या सर्वच पक्षांकडून विजयाचा दावा करण्यात आला.
शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या प्राप्त अर्जांची छाननी 13 नोव्हेंबरला तर अर्ज मागे घेण्याची मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. तर १ डिसेंबरला मतदान झाल्यानंतर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. जुलै महिन्यात या जागांची मुदत संपली होती. मात्र कोरानामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.
विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी नागपूर, औरंगाबाद पुणे, अमरावती या ठिकाणी उमेदवारांनी पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये
पुणे पदवीधर मतदारसंघ
राष्ट्रवादीकडून अरूण लाड यांना उमेदारी जाहीर झाल्यानंतर आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, आज सकाळपासूनच पुण्यातील विधानभवन परिसरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पुणे पदवीधरसाठी रयत क्रांती संघटनेचे उमेदवार एन.डी चौगुले, आम आदमी पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल पवार, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अरुण खरमाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघ-
पुणे शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेले विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी गुरुवारी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून जयंत आसगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघ
काँग्रेसकडून अभिजत वंजार यांचा अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, नितिन राऊत, या नेत्यांची उपस्थिती. काँग्रेसकडून विजयाचा दावा केला आहे. तर भाजपकडून भाजपकडून संदीप जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावन्नकुळे असे दिग्गज नेते उपस्थित होते.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता पक्षांतर्गत बंडखोरी झाली आहे. बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्याचबरोबर भाजपचे प्रवीण घुगे व जयसिंगराव गायकवाड यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. बंडखोरी शमवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. बोराळकर यांचा अर्ज दाखल करण्याकरिता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली होती.
महाविकास आघाडीकडून सतिश चव्हाण यांचा अर्ज दाखल-
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सतीश चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे यांच्यासह शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अन्य नेते यावेळी सतीश चव्हाण यांच्यासोबत होते. सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
या ठिकाणीही महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. मात्र, ते अर्ज मागे घेतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.