मुंबई :काही भागांमध्ये पाऊस पडला. त्या पावसामुळे काही भागांमध्ये पेरणीही झाली. काही भागांमध्ये पाऊसच कमी आहे. काही विदर्भाचा आणि मराठवाड्याचा भाग आहे. पाऊस कमी पडल्यामुळे तिथे पेरण्या उशिरा झाल्या. ज्या पेरण्या झाल्या त्या उगवल्या नाहीत. त्याची तक्रार माझ्याकडे आलेली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत :पेरण्या करायला 100 मिलिमीटर तरी पाऊस पडायला पाहिजे, असे कृषी विभागाकडून आम्ही शेतकऱ्यांना सांगितले होते. परंतु, शेतकरी बांधवांनी तरीही पेरणी केली. त्यांच्यासाठी महाबीज किंवा बाकीच्या कंपनींकडून चांगल्या दर्जाचे बी मिळाले पाहिजे. नाहीतर एकदा अपयश आल्यानंतर पुन्हा पेरणी करून जर अपयश आले तर ते योग्य नाही. सर्व कंपन्यांना आदेश देण्यात आलेत. पुण्यातील कृषी आयुक्त परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. तर कोणत्या दिवशी किती पाऊस कशा पद्धतीने पडला आणि त्या ठिकाणची स्थिती काय या आहे, बियाणे, खत कुठे कमी पडतात याचा आढावा घेतला जाईल; कारण आता आमच्याकडे 96 टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने दाखवला आहे.
शेतकऱ्यांनी कमी मुदतीची पिके घ्यावी :हवामान खात्याने दाखवलेल्याप्रमाणे जर 90 टक्के पाऊस पडला तर त्याप्रमाणे आखणी केली जाईल. मात्र, त्यापेक्षा अधिक जरी पाऊस पडला तरी आताच्या काळात न पडलेल्या पावसाची तूट भरून काढता येणार नाही. यासाठी आता शेतकऱ्यांनी कमी मुदतीची पिके घ्यावीत, असे आवाहन आम्ही करत आहोत.