मुंबई : विविध कामांच्या लोकार्पण व भुमीपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येत आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यात आल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने बेस्टला दिलेल्या जाहिरातींची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.
बेस्टवर राज्य सरकारची जाहिरात : मुंबई महापालिकेचा बेस्ट उपक्रमाकडून शहर आणि उपनगरात गल्लोगल्ली परिवहन सेवा दिली जाते. बेस्टचे जाळे शहर आणि उपनगरात पसरले आहे. यामुळे बेस्टच्या बस गल्लोगल्ली जातात. याचा फायदा जाहिरातदारांना होतो. असाच फायदा राज्य सरकारकडून करून घेण्यात आला आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालिकेच्या सुशोभीकरण तसेच विविध प्रकल्पांचे उदघाटन आणि भूमिपूजन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून बेस्टच्या बस आणि बस स्थानकांवर आपला दवाखाना तसेच मुंबई सुशोभीकरण प्रकल्प यांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत.
आकडेवारी गुलदस्त्यात : बेस्टच्या बसवर आणि बस स्टॉपवर ज्या प्रमाणात जाहिराती करण्यात आल्या आहेत. त्याची आकडेवारी बेस्ट उपक्रमाकडे मागितली असता ती आमच्याकडे नसल्याचे सांगण्यात आले. बेस्टने जाहिरातीसाठी एजन्सी नियुक्त केली आहे. या एजन्सीकडे आकडेवारी मिळू शकते असे बेस्टकडून सांगण्यात आले. बेस्टकडून साइन पोस्ट इंडिया या एजन्सीचे नाव सांगण्यात आले आहे. या एजन्सीकडे मागणी करूनही याबाबातची आकडेवारी या एजन्सीनेही उपलब्ध करून दिलेली नाही. यामुळे नेमक्या किती बस आणि बस स्टॉपवर जाहिराती करण्यात आल्या, याची आकडेवारीच समोर आलेली नाही.