मुंबई :मानसिक आजारांमध्ये नैराश्य, स्क्रिझोफेनिया, एन्झायटी आदी प्रकारचे आजार होतात. ड्रग्स आणि अल्कोहोल यामुळेही मानसिक संतुलन बिघडते. जीवनात एखादा प्रसंग काहींच्या मानसिकतेवर परिणाम करतो. अशा परिस्थितीतील रुग्णांना घरी ठेवण्याचे धाडस कुटूंबीय करत नाहीत. बाजूचे लोक आपल्याला काय बोलतील या भीतीने नातेवाईक रुग्णांना थेट मानसिक उपचार करणाऱ्या रुग्णालयात दाखल करतात. या रुग्णांना नातेवाईक भेटायला सुद्धा येत नाहीत. त्यामुळे या रुग्णांची जबाबदारी रुग्णालयावर असते. नातेवाईकाना त्यांचा रुग्ण बरा झाला आहे. त्याला आता घरी औषधोपचार केल्यास तो सामान्य जीवन जगू शकतो असे सांगूनही नातेवाईक रुग्णांना घरी घेऊन जात नाहीत अशी माहिती लाळे यांनी दिली.
सरकार मनोरुग्णांच्या रिहॅबिलिटेशनचा खर्च करणार :मानसिक उपचार करणाऱ्या रुग्णांना नातेवाईक घरी घेऊन जाण्यास तयार नसल्याने आता त्यांना रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाकडे पाठवण्यात आला होता. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ठाणे मानसिक उपचार रुग्णालयात २० ते ३० वर्षे असलेले २०० रुग्ण आहेत. त्यापैकी ४० रुग्णांना रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवले जाणार आहे. रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये एका रुग्णावर महिन्याला १३ हजार रुपये खर्च येणार आहे. हा खर्च आता राज्य सरकारचा समाज कल्याण विभाग करणार आहे असे लाळे यांनी सांगितले.
काय आहेत नातेवाईकांच्या अडचणी :मानसिक रुग्ण ज्याच्या घरी असतो अशा कुटूंबातील ८० टक्के नातेवाईक त्याला घरी ठेवत नाहीत. काही असे रुग्ण असतात ज्यांना औषधे दिली तरी ते घरी राहू शकतात. मात्र मध्यमवर्गीय कुटूंबातील लोकांना रुग्णांच्या औषधांचा खर्च झेपत नाही. बाजूला राहणारे लोक मानसिक रुग्णाला घरी का ठेवले असे टोचून बोलत असतात. सर्वोच्च न्यायालय आणि मानवी हक्क आयोगाने मानसिक रुग्णांना घरी नातेवाईकांसोबत राहणे हा त्यांचा हक्क आहे असे म्हटले आहे. काही वेळा मानसिक रुग्ण नातेवाईक घरी घेऊन जात नसल्याने पोलिसांची मदत घेऊन त्या रुग्णांना घरी पाठवावे लागते असे लाळे यांनी संगितले.