महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्रासोबत राज्य शासनही लघु उद्योगांना देणार पॅकेज - सुभाष देसाई

लवकरच केंद्र आणि राज्य शासन लघु उद्योगांसाठी मोठ्या पॅकजची घोषणा करेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

subhash desai
सुभाष देसाई

By

Published : May 6, 2020, 8:32 PM IST

मुंबई - केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच केंद्र आणि राज्य शासन लघु उद्योगांसाठी मोठ्या पॅकजची घोषणा करेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. यंगीस्थान फेसबूक ग्रुपच्या वतीने आयोजित बिझनेस टॉक या कार्यक्रमात देसाई बोलत होते.

लघु उद्योग क्षेत्र हे उद्योगांचा कणा आहे. परंतू, कोरोनामुळे हे क्षेत्र संकटात सापडले आहे. लघु उद्योगांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे उद्योगमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सध्या उद्योग क्षेत्र मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. दीड महिन्यांपासून राज्यातील बहुतांश उद्योग ठप्प आहेत. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही. या संकटातून बाहेर पडण्याचा सरकारचा प्रयत्न असून, सध्या १५ हजारांहून अधिक उद्योग सुरू झाले आहेत. ३ लाख कामगार कामावर येत आहेत. उद्योग सुरू करताना कामगारांच्या वाहतुकीसाठी दुचाकींना परवानगी दिलेली आहे. उद्योगचक्र हळुहळु पूर्वपदावर येत असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

मुंबईमध्ये करोनाचा अधिक प्रादुर्भाव आहे. तरीही निर्यात केंद्रीत उद्योगांना आम्ही परवानगी दिली आहे. शेती क्षेत्राला अडचण होऊ नये, यासाठी कृषी साहित्याची निर्मिती करणाऱ्यांना परवानगी दिली असल्याचे देसाई म्हणाले. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. उद्योगांना या आव्हानात्मक परिस्थितीत काही सवलती देता येतील का, यावर उद्योग विभाग काम करत असल्याचे देसाई म्हणाले.


लघु उद्योगांना सावरण्यासाठी लवकरच राज्य व केंद्र शासन पॅकेजची घोषणा करणार आहे. राज्य शासनाचा उद्योग विभाग त्यावर काम करत आहे. याशिवाय लघु उद्योगांचे वीजेचे फिक्स चार्जेस स्थगीत केले आहेत. जेवढा वीज वापर होईल, तेवढेच दर आकारले जातील, असेही देसाई यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details