मुंबई -कोरोना काळात स्वतःच्या जीवाची काळजी न करता देशभरातील शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणासह कोविड ड्युटी बजावली आहे. कर्तव्यावर असताना अनेक शिक्षकांचा मृत्यूदेखील झालेला आहे, अशा परिस्थितीत देशातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने या कोरोनाकाळात सुद्धा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले आहे. मात्र, राज्य सरकारने आतापर्यत राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांला स्थगिती दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे पुरस्कार जाहीर करावे, अशी मागणी शिक्षकांच्यावतीने करण्यात आली आहे.
पुरस्कारांपासून राज्यातील शिक्षक वंचित-
कोरोनाच्या काळात सुद्धा केंद्र सरकारने मागील वर्षी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले आहेत. यावर्षीही आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. परंतु राज्य सरकारकडून मागील वर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांची निवड करण्यात आलेली नाही आणि प्रदानही करण्यात आलेले नाहीत. ही खेदाची गोष्ट आहे. शिक्षकांच्या कार्याची दखल न घेण्यासारखेच आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केली आहे. तसेच कोरोना महामारी असली तरी शिक्षकांकडून मात्र, ऑनलाईन शिक्षण चालूच आहे. नेमून दिलेली सर्व कामे वेळच्यावेळी पूर्ण होत आहेत. शासनाच्या सर्व उपक्रमातही शिक्षकांचा सहभाग आहे. शिक्षकांचे योगदान चालूच आहे. असे असताना शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारांपासून का वंचित ठेवले जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.