मुंबई :राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी आशा अनेक इच्छुक आणि ज्येष्ठ आमदारांना लागून राहिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे गाजर सातत्याने आमदारांना देत आहेत. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने पालकमंत्रीपदाचा तिढाही निर्माण झाला आहे. संबंधित जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्र्यांनी पालकमंत्रीपदाचा दावा केला असल्याने आता तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पालकमंत्रीपदाच्या हट्टाचा नवा वाद रंगू लागला आहे. सरकारने स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणासाठी तात्पुरत्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, यामुळेसुद्धा नवा वाद निर्माण झाला आहे.
'हे' पाच जिल्हे वादात :पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सध्या भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. मात्र, या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हवे आहे. जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन आग्रही आहेत. तेथे गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळ आग्रही असताना नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले आहे. तर दादा भुसे हेसुद्धा नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी स्पर्धेत आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यांच्याकडे ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र कोल्हापुरात ध्वजारोहणाकरता जाण्यासाठी पवार इच्छुक नाहीत. कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी हसन मुश्रीफ इच्छुक आहेत; मात्र त्यांना सोलापूरची जबाबदारी देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आदिती तटकरे यांना हवी आहे; मात्र तटकरे यांना गोगावले आणि महेंद्र दळवी तसेच अन्य आमदारांचा विरोध असल्याने सध्या तरी रायगडच्या ध्वजारोहणाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. परंतु हा महत्त्वाचा जिल्हा पाहता या जिल्ह्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याच्या ध्वजारोहणाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.