मुंबई -राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने सत्ताधारी पक्षांकडून सरकारच्या कामांची जंत्री दिली जात असतानाच विरोधकांनी मात्र सरकारच्या कारभारावर बोट ठेवले आहे. राज्यातील तिघाडीच्या परावलंबी सरकारने महाराष्ट्राला वर्षभरात परावलंबी केले, अशी टीका आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करून वर्षपूर्ती निमिताने महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 'परावलंबी वर्ष!' तिघाडीच्या परावलंबी सरकारने महाराष्ट्राला वर्षभरात परावलंबी केले. कोणतीही कणखर भूमिका नाही, ठोस निर्णय नाही, शेतकरी, कामगार, श्रमिक, बलुतेदार, छोटे उद्योग यांना कसलीही मदत केली नाही. खंबीर आधार नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवून रडगाणे गाणारे नेतृत्व दिसले. शाळा, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, आरक्षण सगळ्याबाबतीत संभ्रम, कापूस, धान खरेदी झाली नाही, शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही, याची हमी नाही. जीथे गणपतीची उंची, लोकल ट्रेनचा निर्णयसुद्धा होऊ शकत नाही. तेथे वर्षपूर्तीचे कसले अभिनंदन आणि कसल्या मुलाखती, असे ट्विट शेलार यांनी केले आहे. ठाकरे सरकारला एक वर्षपूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीवरही शेलार यांनी सडकून टीका केली.