मुंबई -महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणाऱ्या वीरांना नम्र अभिवादन केले. तसेच 1 मेपासून 18 ते 44 या वयोगटीतील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असून ही जबाबदारी पेलण्यास राज्य सरकार समर्थ असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यात लागू असलेल्या कडक निर्बंधासंदर्भात महाराष्ट्राची जनता संयम पाळत असून यापेक्षा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. तर कडक निर्बंध लावल्याने कोरोना रुग्णांची वाढ मंदावली अजून काही काळ ही बंधने पाळण्याची गरज सल्याचेही असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ -
यावेळी बोलताना त्यांनी गेल्या वर्षभरात राज्य सरकारने कोरोना संबंधात काय उपाययोजना केल्या यादंर्भातही माहिती दिली. गेल्या वर्षी कोरोनाची सुरूवात झाली, तेंव्हा राज्यात केवळ दोन प्रयोगशाळा होत्या. मात्र आता राज्यात 600 च्या वर प्रयोगशाळा सुरू केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सुरूवातीला राज्यात 2665 कोविड सेंटर होती. आता 5500 च्यावर कोविड सेंटर सुरू केले असल्याचेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे बेडची संख्या 3 लाख 36 हजार वरून आता 4 लाख 21 हजार, ऑक्सिजन बेडची संख्या 800 वरून 86 हजार, आयसीयू बेडची संख्या 11हजार 882 वरून 28 हजार 937 तर व्हेंटीलेटर बेडची संख्या 3 हजार 744 वरून 11 हजार 713 करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. गॅस ऑक्सिजनची वाहतूक करणे कठीण असल्याने महाजेनकोच्या खापरखेडा, अकोला आणि परळीच्या वीज केंद्रानजीक मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धतेसह अनेक सुविधा उभ्या करण्यात येत आहेत. रिलायन्सच्या नागोठाणे प्रकल्पाजवळ जम्बो केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. पेनमधील जेएसडब्ल्यू कंपनीच्या रुग्णालयात जम्बो कोविड सेंटर सुरु होत आहे, तर लॉयल स्टील वर्धा परिसरात १ हजार बेडसची जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
12 कोटी डोस विकत घेण्याची तयारी -
राज्यात 1 कोटी 58 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून 1 मेपासून 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सूरूवात होणार आहे. या वयोगटामध्ये राज्यातील सुमारे 6 कोटी नागरिकांचा समावेश असून प्रत्येकाला दोन डोज याप्रमाणे 12 कोटी डोसेसची गरज पडणार आहे. हे संपूर्ण डोज एक रकमी चेक देऊन विकत घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे. त्यासाठी लस उत्पादकांशी बोलणी सूरू असल्याचेही ते म्हणाले. तसेच मे महिन्यात केंद्र सरकारतर्फे 18 लाख डोस मिळणार असून पुरवठा होईल, तसे लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी न करता शिस्त पाळावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.