मुंबई :महाराष्ट्रातील चित्रपटगृह आणि महाराष्ट्रातील नाट्यगृह यामध्ये प्रचंड सोयीसुविधांच्या बाबत तफावत आहे. चित्रपटगृह बऱ्यापैकी ठीक आहेत. मात्र नाट्यगृह या सोयी सुविधांपासून वंचित आहे, असंख्य अडचणी आहेत. त्यामुळे शासनाने दोन दिवसांपूर्वीच नाट्यगृहांच्या संदर्भात अत्याधुनिक करून सुसज्ज करू, अशी घोषणा केली होती. नाट्यसृष्टी व चित्रपट सृष्टी वैभव जपण्याचा शासन प्रयत्न करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी केली आहे.
प्रशांत दामले यांच्या विक्रमी नाट्य प्रयोगानिमित्त गौरवाद्गार -मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी अभिनेते प्रशांतदामले यांच्या १२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगानिमित्त त्यांना गौरविताना दिली.
मुंबई, ठाण्याच्या मध्यभागी एक चित्रनगरी - प्रशांत दामले यांच्या नाटकाचा १२५०० वा विक्रमी प्रयोग होत आहे. पण आपणही १२५०० नाटक केली आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले. कोविड काळात नाट्यगृहांचे भाडे कमी करा अशी मागणी दामले यांनी केली होती. मी त्यावेळी भाडे कमी केले. त्यावेळी मी एकटा होतो. आता मी आणि उपमुख्यमंत्री असे आम्ही दोघे आहोत. त्यामुळे कामे लवकर होतात. आमच्या ठाण्यात मोठ्या संख्येने लोक शुटींगसाठी येतात. त्यासाठी मुंबई आणि ठाण्याच्या मध्यभागी एक चित्रनगरी उभारली जाईल. तसेच, राज्यातील ५१ नाट्यगृहाची नोडल ऑफिसर नियुक्त करून पाहणी केली जाईल. नाट्यगृहात ज्या काही कमी असेल त्याची पूर्तता करून ती अद्ययावत केली जातील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
रंगभूमीसाठी अभिमानाची बाब - एखाद्या नटासाठी रंगभूमीवर १२,५०० प्रयोग पार पाडणे ही अजिबात सोपी गोष्ट नाही. हा प्रवास खडतर असणार हे निश्चितच आहे. त्यानंतर आता प्रशांत दामलेंना पद्म पुरस्कार मिळणे ही त्यांच्यासाठी आणि मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीसाठी अभिमानाची बाब आहे अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. प्रशांत दामलेंना या प्रवासात अनेक चढउतार पाहायला मिळाले. एवढ्या वर्षांचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. आता रंगभूमी वरील त्यांच्या १२,५०० व्या प्रयोगानिमित्त त्यांनी या कडू गोड आठवणींना उजाळा दिला आहे.
तो खरा नाटकवाला - या प्रवासाविषयी त्यांनी जुन्या आठवणी सांगत लिहिलं आहे कि, ' येत्या काही दिवसांतल्या माझ्या १२,५०० व्या प्रयोगाचं! लोक मला विचारतात, ‘या टप्प्यावर मागे वळून बघताना कसे वाटते?, पण खरं सांगतो, हे एवढे प्रयोग कधी, कसे झाले, मला कळलेच नाही. मला नाटक करायचे आहे, लोकांना नाटक दाखवायचे आहे एवढेच मला कळत होते. तसा ‘नाटकवाला’ होण्याला घरून विरोधच होता. तेव्हा संगीत नाटकांचा भर ओसरत चालला होता. त्यामुळे ‘आता नाटकाचे कसे होणार?’ ही चर्चाही सुरू झाली होती. पण तुम्हाला म्हणून सांगतो- ही चर्चा सतत होतच असते. परंतु, नाटक आजवर काही थांबलेले नाही. काळानुसार फक्त ते बदलत गेले. आणि हे जो जाणून असतो, तो खरा नाटकवाला !' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.