आरोग्य कर्मचाऱ्यांच्या साहित्य खरेदीला राज्य सरकारचा हिरवा कंदील - महाराष्ट्र कोरोना न्यूज
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्र व राज्यशासन तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनीही काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
मुंबई -कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी वैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा देताना व्यत्यय येऊ नये आणि रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी सर्व साहित्य खरेदीचे तत्काळ आदेश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
इंजेक्शनच्या कुपी खरेदी
कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. स्वतःची कुटुंबाची पर्वा न करता सेवा देत आहेत. ही सेवा देताना त्यांच्याकडे पुरेसे प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध असावे यासाठी मंत्री वडेट्टीवार यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून १३२ ऑक्सिजन प्लांट, ४० हजार ७०१ ऑक्सिजन सांद्रित्र, २७ आयएसओ टॅंक्स, २५ हजार मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, १० लाख रेमडीसीवर इंजेक्शनच्या कुपी खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.
नागरीकांनी गर्दी करु नये
कोरोना विषाणू हे जागतिक संकट आहे. या संकटातूनही आपण बाहेर पडू. या संकटाचा मुकाबला आपण सर्वांनी मिळून एकजुटीने करुया. परंतु या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी कमी करणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन वेळीच पावले उचलून विविध आदेशांची अंमलबजावणी करत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
अफवा पसरवू नका
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्र व राज्यशासन तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनीही काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. या आजारावर वेळीच उपचार झाले आणि रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केले तर हा आजार निश्चित बरा होतो. म्हणून कोणीही या आजाराबाबत चुकीच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले आहे.