मुंबई - कोरोना, डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत नव्याने निर्बंध लागू केले आहेत. लोकांमध्ये याबाबत अनभिज्ञता आहे. जमाव व मेळावे, धार्मिक स्थळे, खासगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळांसहित कोणत्या वर्गाला हे निर्बंध लागू असतील याबाबत राज्य सरकारने निर्बंधांची नियमावली सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत उपलब्ध करून दिली आहे.
जमाव/ मेळावे
लग्न समारंभ, पार्टी, निवडणुका, प्रचार, सोसायटी बैठका, धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम, क्रीडा सामने, सामाजिक कार्यक्रमांमध्ये जमाव करू नये. तसे आढळून आल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन जिल्हाधिकारी मार्फत कारवाई केली जाईल. राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वे अन्य जमवासाठीही लागू असतील. त्यामुळे, 100 पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पूर्णपणे बंदी असेल. फक्त स्थानिक प्रशासन आणि वैधानिक स्वरुपाच्या जमावाला यातून सूट देण्यात येईल.
हेही वाचा -OBC RESERVATION : भाजपचे चक्का जाम आंदोलन, चित्रा वाघसह अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
स्थानिक प्रशासन आणि वैधानिक स्वरुपाच्या जमावाला मार्गदर्शक तत्वे हे 4 जून 2021 च्या आदेशानुसार लागू असतील. अत्यावश्यक कामासाठी जिल्हाधिकारी यांच्या शिफारशीनुसार एसडीएमए/ युडीडी /आरडीडी यांच्याकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. बांधकाम होत असलेल्या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त संख्येने काम करता येणार नाही. खुल्या जागेच्या ठिकाणीही क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना काम करता येणार नाही. कोणतेही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त असू शकणार नाही.
एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त संमेलन नियोजित केले गेले असतील तर या दोन मेळाव्यांदरम्यान पुरेसा कालावधी असावा आणि तो अशा पद्धतीचा असावा जेणेकरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या पाहुण्यांमध्ये वार्तालाप आणि परस्पर संवाद होणार नाही. तसेच, दोन संमेलनांच्या दरम्यान सदर ठिकाणी पूर्णपणे सॅनिटायझर व स्वच्छता करावी लागेल. एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी संमेलने होत असतील तर तिथले कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण केलेले असावे किंवा त्यांच्या नियतकालिक चाचण्या आवश्यक असतील. संमेलन अथवा मेळावे होत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी सादर केलेले एसओपी यांचा काटेकोरपणे पालन करावा आणि असे होत नसल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
जर वारंवार मार्गदर्शक एसओपीचे उल्लंघन होत असेल, तर त्या स्थापनेला पूर्णपणे बंद केले जाईल आणि जोपर्यंत कोविड आपत्ती म्हणून अस्तित्वात असेल, तोपर्यंत या आस्थापनांना उघडण्याची मुभा मिळणार नाही. स्तर तीन, चार आणि पाच येथील जमाव अथवा मेळाव्यांवर पूर्णपणे बंदी असेल. फक्त चार जूनच्या आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणांसाठी परवानगी असेल. जर एखाद्या ठिकाणी खाण्या-पिण्यासह संमेलन असेल आणि त्या ठिकाणी मास्क काढावे लागत असतील तर अशा ठिकाणी उपाहारगृहांसाठी जारी केलेली मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली जाईल.
धार्मिक स्थळ
स्तर तीन, चार आणि पाचमध्ये सर्व धार्मिक स्थळे अभ्यागतांसाठी बंद असतील. अभ्यागतांसाठी धार्मिक स्थळ स्तर दोनमधून पूर्व परवानगी घेतल्यानंतर उघडले जातील. जमावाचे सर्व नियम पाळून स्तर एक मधील अभ्यागतांना धार्मिक स्थळे खुले असतील. धार्मिक स्थळांच्या परिसरात राहणाऱ्या व धार्मिक विधी पार पाडणारे कर्मचाऱ्यांसाठी धार्मिक स्थळे उघडी असतील, परंतु कर्मचाऱ्यांसाठी ‘आयसोलेशन बबल’ आवश्यक असेल. बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही धार्मिक स्थळे बंद असतील. धार्मिक स्थळ की, जेथे लग्नकार्य आणि अंतिम संस्कार केले जात असतील, त्या ठिकाणी जमावासाठी लागू असलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. कोणत्याही धार्मिक कार्य किंवा पवित्र दिवसाच्या निमित्ताने काही विशेष कार्य असल्यास त्या धार्मिक स्थळाला सर्व नियमांचे पालन करून ते पार पाडावे लागतील.
खासगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे
शाळा, महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्थांसाठी असलेले नियम खासगी प्रशिक्षण वर्ग अर्थात कोचिंग क्लासेस आणि कौशल्य केंद्रांसाठी लागू असेल. यासाठी एसडीएमए वेगळे मार्गदर्शक तत्वे जारी करतील, तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या नियमांचे पालन केले जाईल.
हॉटेल
पाहुण्यांना प्रवेशासाठी सर्व स्तरांच्या हॉटेलांना उघडे ठेवण्याची परवानगी असेल. वेगवेगळ्या स्तरांतून येणाऱ्या पाहुण्यांच्या निर्बंधांबद्दल अंकुश ठेवण्याची जबाबदारी ही त्या हॉटेलांच्या आस्थापनेवर असतील. जर एखाद्या हॉटेल स्थापनेला एखादा पाहुणा निर्बंधांच्या विरुद्ध प्रवास करून आल्याचे समजल्यास डीडीएमए यांना तात्काळ माहिती द्यावी लागेल. एखादा पाहुणा राज्याच्या बाहेरून आला असेल तर हॉटेल आस्थापनेला खात्री करावी लागेल की, तो संवेदनशील ठिकाणाहून आलेला नाही. यासाठी एसडीएमए यांनी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत आणि जर तो अशा संवेदनशील ठिकाणाहून आला असेल तर त्या संबंधीच्या सर्व मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करावी लागेल.
जर एखादा पाहुणा या मार्गदर्शकांचे पालन करत नसेल तर त्याची माहिती तात्काळ डीडीएमए यांना द्यावी. हॉटेलमधील उपहारगृहे हे त्या ठिकाणी राहणाऱ्या पाहुण्यांसाठी मर्यादित असेल. तेही क्षमतेच्या 50 टक्के अटीवर आणि सर्व एसओपी यांचा पालन करून. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी लागू असलेल्या निर्बंधांचे पालन करून सेवा देता येईल. उदाहरणार्थ पार्सल अथवा होम डिलिव्हरी इत्यादी, हॉटेल मधील क्रीडा अथवा जलतरण पूल यासारख्या सामायिक सुविधांचा उपयोग लागू केलेल्या निर्बंधांना अनुसरूनच करावा लागेल. ते आवश्यक सेवेमध्ये येत नसल्याने व नियमित सुविधांमध्ये नसल्यास ‘इन हाऊस’ पाहुण्यांसाठी खुला नसेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड करण्यात येईल व वारंवार उल्लंघन केल्यास कोविड-१९ आपत्ती असल्याची सूचना अस्तित्वात असेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येईल.
पर्यटन स्थळे
एसडीएमए यांची पूर्वपरवानगी घेऊन डीडीएमए कोणत्याही प्रतिष्ठित पर्यटन स्थळांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करू शकते. या घोषणेनंतर डीडीएमए त्या ठिकाणासाठी वेगळे स्तर देऊ शकते. आणि हे या ठिकाणच्या कोविड-१९ परिस्थितीवर अवलंबून असेल. तिथल्या विविध घटकांवर हा निर्णय निर्भर असेल आणि यासाठी पॉझिटिव्हिटी रेट किंवा भरलेले ऑक्सिजन बेड हे निकष नसतील. हॉटेल जवळपासच्या प्रशासकीय घटकांच्या तुलनेत एक स्तरापेक्षा जास्त कमी असता कामा नये. जर डीडीएमए यांना वाटल्यास ते अशा पर्यटन स्थळी आणखी जास्त निर्बंधही लावू शकतात.
थर्मल स्कॅनिंग किंवा लक्षणे चाचणीसाठी डीडीएमए सीमेवर चेक पोस्ट लावू शकतात. तसेच, येणाऱ्या पाहुण्यांवर त्याचे चार्ज लावू शकतात. अशा ठिकाणच्या पायाभूत सुविधा आणि पाहुण्यांची वर्दळ याच्या आधारे डीडीएमए अशा या ठिकाणी जास्त निर्बंध लावू शकतात. या पर्यटन स्थळांच्या परिसरातील सर्व हॉटेलांसाठी हॉटेलचे मार्गदर्शक तत्वे लागू असतील. त्याचप्रमाणे डीडीएमए जास्त दक्षता घेतील आणि वेळोवेळी यावर नजर ठेवतील. जर हे स्थळ स्तर पाचमध्ये असेल, तर ई पास शिवाय कोणत्याही अभ्यागतांना तिथे येण्याची परवानगी नसेल. जर येणारे पाहुणे स्तर पाच प्रशासकीय घटकांमधील असेल तर त्यांना एक आठवड्यासाठी विलगीकरणात रहावे लागेल.
पाहुणे सर्व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करत आहेत की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी त्या हॉटेल अथवा होम स्टे किंवा पर्यटक आस्थापनेची असेल. निष्काळजीपणा करणारे पाहुणे, तसेच आस्थापना, व्यवस्थापनेविरोधात दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. या मार्गदर्शक तत्वांचे पाहुण्यांकडून किंवा हॉटेल, होम स्टे, पर्यटक आस्थापनेकडून उल्लंघन झाल्यास त्यांची परवानगी काढून घेतली जाऊ शकते आणि जोपर्यंत कोविड-१९ आपत्ती म्हणून अस्तित्वात असेल, तोपर्यंत त्यांना पुन्हा चालू करण्याची मुभा राहणार नाही. एसडीएमए यांना वाटल्यास ते एखाद्या पर्यटन स्थळाला वेगळ्या प्रशासकीय घटकांमधून काढू शकतात, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वास विभागामार्फत परिपत्रक काढण्यात आले आहे.
हेही वाचा -मुंबईतील परिचारिकांच्या लढ्याला यश; 100 टक्के मागण्या मान्य