मुंबई- जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात कोव्हिड १९ म्हणजेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत वातानुकुलित यंत्रणांचा वापर कमी करण्याबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -राज्यात आणखी २ कोरोनाग्रस्त आढळले, एकूण आकडा ४७ वर
राज्य सरकारने एक परिपत्रक जाहीर करून या सूचना जाहीर केल्या आहेत. कोरोनाचे विषाणू शिंकण्या व खोकल्यातून उडालेले थेंब हवेतील धुलीकणांसोबत विविध वस्तूंच्या पृष्ठभागावर स्थिरावतात. मध्यवर्ती (सेंट्रलाईज) वातानुकुलन किंवा वातानुकुलित खोलीमध्ये असे विषाणूमिश्रीत थेंबातील विषाणू जास्त कालावधीसाठी जिवंत राहतात. परंतु, योग्य वायुविजन (वेंटीलेशन) किंवा तापमान जास्त असलेल्या वातावरणात हे थेंब लवकर सुकल्याने या विषाणूचा जीवन कालावधी कमी होतो. त्यामुळे राज्यातील सर्व कार्यालयात वातानुकुलित यंत्रणा न वापरण्याच्या किंवा गरजेपुरता कमीत कमी वापर करण्याच्या सूचना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारचे तातडीचे परिपत्रक अत्यंत तातडीची सूचना म्हणून सर्वच शासकीय कार्यालये तसेच सेंट्रलाईज एसी वापरकर्ते, घरगुती एसी वापरकर्ते यांच्यासाठी ही सूचना जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या गंभीर सूचनेमुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना वातानुकूलित यंत्राशिवाय राहावे लागणार आहे.
हेही वाचा -जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार - मुख्यमंत्री