महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसुख हिरेन प्रकरणात 18 दिवसात 'एनआयए'ने काय तपास केला? - परमबीर सिंह रश्मी शुक्ला सचिन सावंत टीका

मनसुख हिरेन हत्याप्रकरणात पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्हीचा 'डीव्हीआर' महत्त्वाचा पुरावा आहे. मात्र, हा पुरावा परमबीर सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीने नेला, असा सचिन सावंत यांचा आरोप आहे.

मुंबई
मुंबई

By

Published : Mar 27, 2021, 4:11 PM IST

मुंबई- परमबीर सिंह यांना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस रश्मी शुक्ला यांच्या अवैद्य कॉल तपशील (सीडीआर) प्रकरणाचा मुद्दा समोर आणत आहेत. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्हीचा 'डीव्हीआर' महत्त्वाचा पुरावा आहे. मात्र, हा पुरावा परमबीर सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीने नेला, असा सचिन सावंत यांचा गंभीर आरोप आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडी सरकारवर बेफाम आरोप करत सुटले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार कसे अस्थिर होईल यासाठीचा पूर्ण प्रयत्न देवेंद्र फडणीस यांचा आहे. मात्र, या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे येणाऱ्या काळात समोर येईल. पण ज्या प्रकारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर पत्राद्वारे आरोप केले त्या आरोपात काही तथ्य नाही हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती असल्याने हे गंभीर प्रकरण कुठेतरी मागे पडावे यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी दिलेला अवैद्य सीडीआर अहवाल प्रकरण यांच्याकडून समोर आणले जाते, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यातच रश्मी शुक्ला यांनी सीडीआर अहवाल तयार केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या हे लक्षात आल्यानंतर त्यासंबंधी रश्मी शुक्ला यांना जाब विचारण्यात आला. मात्र, आता तोच अहवाल घेऊन देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत. पण राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपल्या अहवालात या अवैद्य सीडीआर अहवालासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. अवैद्य सीडीआर अहवालामध्ये 6.3 जीबीचा पेनड्राइव नव्हता, असे या अहवालातून समोर येत आहे. मग देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेला पेन ड्राईव्ह कोणता? असा देखील प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केला. रश्मी शुक्ला यांनी तयार केलेल्या अवैध सीडीआर प्रकरणात काही तथ्य नसताना हे माहीत असून देखील केवळ परबीर सिंह यांना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस रश्मी शुक्ला यांचे प्रकरण समोर आणत आहेत, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात गेल्या 18 दिवसात एनआयएने काय तपास केला?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. त्यानंतर कार मालक मनसुख हिरेन याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मनसुख हिरेन हत्या प्रकरणात छडा लावला. मात्र, त्यानंतर लगेचच एनआयएने हे प्रकरण आपल्या ताब्यात घेतले. पण मनसुख हिरेन हत्याप्रकरणात गेले अठरा दिवस त्यांनी काय तपास केला? या संदर्भात अजून काहीही माहिती समोर आलेली नसल्याचे म्हणत त्यांनी आरोप केला. तसेच सचिन वाजे थेट परमबीर सिंह यांना माहिती देत होते. सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचा एक पोलीस थेट पोलीस आयुक्तांना कशी काय माहिती देऊ शकतो? 'एपीआय'च्या वरिष्ठांना सचिन वाझे यांनी का माहिती दिली नाही? असा देखील प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केला.

पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गेला कुठे?

मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये एटीएस तपास करत असताना पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर एटीएसने पुरावा म्हणून जमा केला होता. डीव्हीआर हा या प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा असल्याने, तो समोर येणे गरजेचे आहे. मात्र, एटीएसला पोलीस आयुक्तालयाच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर दिल्यानंतर केवळ दीड तासानंतर एटीएस प्रमुखांना मुंबई पोलीस आयुक्तालयातून फोन येतो आणि त्या डीव्हीआरमध्ये काही तांत्रिक समस्या असल्याचे सांगून तो डीव्हीआर परत घेतला गेला. एटीएसकडून डीव्हीआर घेण्यासाठी परमबीर सिंह यांच्या जवळची व्यक्ती आली होती, अशी माहिती असून याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच डीव्हीआर हा महत्त्वाचा पुरावा असून अद्याप तो समोर आलेला नाही. मनसुख हिरेन हत्या प्रकरणांमध्ये एपीआय सचिन वाझे, एपीआय रिझवान काझी आणि पी आय उबाळे हे पोलीस आयुक्तालय येथील आहेत. तसेच सापडलेली ईनोवा गाडी ती देखील मुंबई पोलीस आयुक्तालय मधली आहे आणि ज्या दोन चालकांना ताब्यात घेण्यात आले ते देखील मुंबई पोलीस आयुक्तालयामधील आहेत, असे असताना एनआयएने गेल्या 18 दिवसांपासून या एकाचीही चौकशी का केली नाही? असा प्रश्न सचिन सावंत यांनी विचारला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details