महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना उपाययोजनांवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक, खासगी रुग्णालयात पालिकेचे अधिकारी नियुक्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश - cabinet meeting on corona news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजही राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्यात पसरलेल्या कोरोना संसर्गावर आळा घालण्याकरता विविध उपाययोजनांवर चर्चा झाली.

कोरोना उपाययोजनांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा रुग्णांना नाकारू नये
कोरोना उपाययोजनांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा रुग्णांना नाकारू नये

By

Published : Jun 2, 2020, 8:51 PM IST

मुंबई - कोरोना उपाययोजनांवर आज (मंगळवार) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. मुंबईतील खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या 80 टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे. यासाठी अशा सर्व रुग्णालयांमध्ये पालिकेने अधिकारी नियुक्त करून नियंत्रण करावे व रुग्णांची हेळसांड होणार नाही, असे पाहावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले.

याप्रसंगी पालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी गेल्या काही दिवसांत मुंबईत खाटा व इतर साधन सामग्रीची कशी वाढ करण्यात आली आहे. तसेच, यामुळे संक्रमण रोखण्यात आपल्याला कसे यश मिळत आहे याबाबत सांगितले. प्रत्येक खाटेला युनिक आयडी देणार, डायलिसीस रुग्णांना यापुढे उपचार मिळणार, प्रयोगशाळांना 24 तासात चाचणी अहवाल देणे बंधनकारक करणार आहेत. असे सांगून आयुक्त चहल म्हणाले, मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग 19 दिवसांवर गेला आहे. कोव्हीड योद्धा म्हणून डॉक्टर्स, परिचारिका पुढे येत आहेत. 3 हजार 750 डॉक्टर उपचारांसाठी उतरत आहेत. 450 डॉक्टर्सपैकी 60 जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मुंबईत सध्या 21 हजार अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले.

आजमितीस देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या 35.23 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. देशाच्या तुलनेत 31.19 टक्के रुग्ण सुधारण्याचे प्रमाण आहे. महाराष्ट्रात मृत्यू दर 3.37 टक्के असून देशाचा मृत्यूदर 2.82 टक्के आहे. जगात दर दहा लक्ष लोकांमागे 778 मृत्यू असताना महाराष्ट्रात हे प्रमाण 48 इतके आहे. आज महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये मृत्यू दर 6.18 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 5.6 टक्के, मध्य प्रदेशात 4.32 टक्के इतका जास्त आहे. एकवेळेस राज्यातील मृत्यू दर 7.5 टक्के होता तो कमी होऊन 3.37 टक्के इतका खाली उतरला आहे. राज्यातील 30 ते 40 वयोगटात कोरोना लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 40 टक्के तर 40 ते 50 वयोगटात ते 18 टक्के आहे. 50 ते 60 वयोगटात ते 16.5 टक्के आहे. मृत्यू पावलेल्या 32 टक्के रुग्णांना इतर कोणतेही आजार नव्हते. 67 टक्के लोकांमध्ये इतर आजारही होते. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 41.33 टक्के तर ठाण्यात 36.59 टक्के आहे.

महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत 4.5 लक्ष चाचण्या झाल्या आहेत. राज्यात 3 हजार 631 चाचण्या दर दशलक्ष झाल्या असून देशात 2 हजार 621 चाचण्या होतात. केवळ आंध्र आणि तामिळनाडू राज्यांत आपल्यापेक्षा जास्त चाचण्या होत आहेत. पूर्वी राज्यात एकूण झालेल्या चाचण्यांपैकी 18 टक्के पॉझिटिव्ह होते आता ते कमी होऊन 15.5 टक्के झाले आहे. सध्या राज्यात केवळ 1 हजार 400 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली. सध्या राज्यात 70 लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यासाठी एकूण 18 हजार पथके नियुक्त करण्यात आली होती. यावेळी बैठकीत 80 टक्के खाटांची अंमलबजावणी रुग्णालयांनी काटेकोरपणे करावी. रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध करण्यासाठी खासगी रुग्णवाहिकासुद्धा अधिग्रहीत कराव्यात. रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांना येणे सोयीचे जावे म्हणून उपनगरीय रेल्वे सेवा त्यांच्यासाठी सुरू करण्याकरिता पाठपुरावा करावा. आदी बाबींवर मंत्रिमंडळ सदस्यांनी सूचना मांडल्या.

सार्वजनिक आरोग्य विभाग; राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ, मंत्रिमंडळाची मंजुरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे आता या योजनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येणार आहेत. या संदर्भातील निर्णयास आज मंत्रिमंडळाने कार्योत्तर मंजुरी दिली. आतापर्यंत राज्यातील ८५ टक्के नागरिकांचा या योजनेत समावेश होता. कोरोनाचा उद्रेक पाहता आता उर्वरित १५ टक्के नागरिकांनाही योजनेचा लाभ मिळणार असल्याने राज्यातील १०० टक्के जनतेचा समावेश या योजनेत करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ३१ जुलै २०२० पर्यंत ही योजना अंमलात राहील. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संभाव्य परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरता या दोन्ही योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी उपचार घेता येतील.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १२०९ उपचार पुरविले जातात. त्याचा राज्यातील २ कोटी २३ लाख कुटुंबांना लाभ मिळत आहे. या अंतर्गत राज्यातील सुमारे ८५ टक्के लोकसंख्येचा समावेश होतो. तसेच, राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील नागरिकांनासुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अनुज्ञेय ९९६ उपचार पद्धतींचा लाभ मान्यता प्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर शासकीय रुग्णालयांकरीता राखीव असलेल्या १३४ उपचारापैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवणयंत्राचा उपचार वगळता १२० उपचार अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये ३१ जुलै २०२० पर्यंत मान्यता प्राप्त दराने करण्यात येतील. याचा लाभ घेण्यासाठी रहिवासी पुरावा म्हूणन वैध पिवळी, केशरी, पांढरी शिधापत्रिका, तहसीलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यांपैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून सादर करावे लागेल. त्याबरोबरच शासनमान्य फोटो ओळखपत्र देणे आवश्यक राहील. कोरोनाच्या साथीचे गांर्भीय आणि उपचाराची तातडी पाहता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबाबत शिथिलता देण्याचे अधिकार राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कोरोनासाठी शासनाने जाहीर केलेल्या खाजगी अंगीकृत रुग्णालयांकडून कोरोना संशयीत रुग्णांवर उपचार करण्याकरीता पीपीई किट्स व एन ९५ मास्कचा आवश्यक वापर करण्यात येईल. त्या प्रमाणात शासनाने ठरविलेल्या दरानुसार निधी देण्यात येईल. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेमार्फत सनियंत्रण केले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांची असणार आहे.

विधि व न्याय विभाग; ठाणे येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय -

ठाणे येथे कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या तसेच जनहित याचिकेमध्ये 130/2004 (मनुभाई वाशी विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर) ठाणे येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. या अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयाकरिता न्यायाधिश -1, सहाय्यभूत कर्मचारी -10 याप्रमाणे पदे निर्माण करण्यास तसेच शिपाई संवर्गातील 2 पदे बाह्ययंत्रणेद्धारे भरण्यास मंजुरी देण्यात आली. याकरिता येणाऱ्या 92लाख 36 हजार 372 रुपये इतक्या रकमेचा आवर्ती व 15 लाख 67 हजार इतक्या रकमेचा अनावर्ती खर्च याप्रमाणे एकूण 1 कोटी 8 लाख 3 हजार 372 रुपये इतक्या रकमेच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.

विधि व न्याय विभाग; मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती, उपसमितीसाठी सचिवांची पदे -

मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती व उप समिती नागपूर आणि औरंगाबादसाठी प्रत्येकी एक प्रमाणे 3 सचिव पदांची निर्मिती करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे लोक न्यायालये, पर्यायी वादनिवारण केंद्र, सर्व तालुका तसेच गावपातळीवरील विविध विषयांवरील जनजागृती, विधी साक्षरता शिबिरे तसेच प्रशिक्षण शिबिरे असे उपक्रम राबविण्यात येऊन प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करता येईल.

उद्योग विभाग; दिघी औद्योगिक क्षेत्रातील अधिसूचित क्षेत्र, एमआयडीसी विकसित करणार -

केंद्र शासनाच्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रकल्पातील दिघी औद्योगिक क्षेत्रामधील अधिसूचित झालेले क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत विकसित करण्यास मान्यता देण्यात आली. महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात मेगा प्रोजेक्ट व परकीय गुंतवणूक करण्यासाठी दिघी औद्योगिक क्षेत्रात उद्योगांकरिता मोठ्या प्रमाणात जागेची मागणी होत आहे. मात्र, महामंडळाकडे पुरेसे क्षेत्र उपलब्ध नसल्याने कॉरिडोर प्रकल्पांतर्गत 12 हजार 140.842 हे.आर क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्र सर्व कायदेशीर बाबी तपासून महामंडळामार्फत विकसित करण्याचे ठरले आहे. यादृष्टीने केंद्र शासन व संबंधित विभागास अवगत करण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details