मुंबई- पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी नदीजोड प्रकल्प प्रस्ताव करण्यात आला होता. हा प्रस्ताव आज जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर सादर केले. या प्रकल्पाबाबत तसेच जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावाबाबत चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी पुढील कारवाईचे आदेश दिले आहे.
आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राज्याच्या निधीतून त्वरित हाती घेण्यात यावेत. या नदीजोड प्रकल्पांमुळे मुंबई शहरासाठी ३१.६० अब्ज घनफूट, गोदावरी खोऱ्यातील मराठवाडा भागात २५.६० अब्ज घनफूट व तापी खोऱ्यासाठी १०.७६ अब्ज घनफूट पाणी कोकणातून उपलब्ध होईल.
पश्चिमवाहिनी नदीखोऱ्यातील (कोकण) उल्हास, वैतरणा, नार-पार व दमणगंगा खोऱ्यात एकूण ३६० अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. हे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे शक्य आहे. त्यासाठी नवीन नदीजोड योजनांचे सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषण त्वरित हाती घेऊन व्यवहार्य योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहेत. अशा एकूण १४० अब्ज घनफूट पाणी वळविण्यासाठीच्या योजनांची निवड जलसंपदा विभागाने प्रस्तावित केली आहे.
मराठवाडा हा अत्यंत अवर्षणप्रवण व सातत्याने दुष्काळी प्रदेश आहे. पाण्याची नैसर्गिक उपलब्धता कमी असल्याने कोकणातील अतिरिक्त पाणी वळवून मराठवाड्यासाठी उपलब्ध करुन देणे हाच पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी सविस्तर सर्वेक्षणाअंती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणाऱ्या योजनांना मान्यता देऊन त्यांची कामे सुरु करण्यात येतील. कोकणातील नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदी खोऱ्यातील पुणे, गंगापूर, वाघाड, करंजवण, भंडारदरा, मुळा, कडवा, मुखणे, भावली इत्यादी धरणांच्या पाणलोट खोऱ्यात हे पाणी वळवता येईल. त्यामार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणापर्यंत पाणी पोहोचू शकेल. तहानलेल्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यास हा मोठा दिलासा ठरणार आहे.
वैनगंगा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी वळविण्याचे प्रस्ताव -