तरुणांनो! आधी रक्तदान करा मग लस घ्या; राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन - blood-shortage-in-state
वर्षभरात रक्तदान न झाल्याने रक्तटंचाई निर्माण झाली. ही परिस्थिती लक्षात घेत अनेक संस्था, गणेश मंडळांनी रक्तदान शिबीर घेत रक्तटंचाई फार गंभीर होऊ दिली नाही. पण आता पुन्हा राज्यात रक्तटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई- मागील वर्षेभरापासून राज्यात अनेकदा रक्तटंचाई निर्माण झाली आहे. अशात आता पुन्हा राज्यात रक्तटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण 18 ते 44 वयोगटाकडून रक्तदान मोठ्या प्रमाणावर होते. आता या वयोगटातील व्यक्तींचे कोरोना लसीकरण होणार असून लसीकरणानंतर दोन महिने रक्तदान करता येत नाही. 1 मेपासून या गटाचे लसीकरण सुरू झाल्यास पुढच्या काही दिवसात रक्तटंचाई निर्माण होऊ शकते, अशी भीती राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तरुणांनी आधी रक्तदान करावे त्यानंतर लस घ्यावी, असे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे.
'या'मुळे वर्षभर रक्तटंचाई
मार्च 2020मध्ये राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आले. एकूणच कोरोनाची भीती, लॉकडाऊनची स्थिती आणि संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी वैयक्तिक रक्तदान करणे बंद केले. रक्तदान शिबिरेही बंद झाली. अशात अॅनिमिया-थॅलेसिमियासारखे रक्ताचे आजार असलेल्यांना, अपघातग्रस्त रुग्णांना रक्ताची गरज लागते. त्यामुळे पुरेसा रक्तसाठा असणे नेहमी गरजेचे असते. पण वर्षभरात रक्तदान न झाल्याने रक्तटंचाई निर्माण झाली. ही परिस्थिती लक्षात घेत अनेक संस्था, गणेश मंडळांनी रक्तदान शिबीर घेत रक्तटंचाई फार गंभीर होऊ दिली नाही. पण आता पुन्हा राज्यात रक्तटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
60 दिवस रक्तदान करता येत नाही
कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर धूम्रपान, मद्यपान टाळावे लागते. तसेच लस घेतल्यानंतर 60 दिवस रक्तदान करता येत नाही. आता 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. रक्तदान करणाऱ्यांमध्ये मोठा गट हा 18 ते 44 वयोगटातील आहे. त्यामुळे हा गट लस घेतल्यानंतर पुढचे दोन महिने रक्तदान करू शकणार नाहीत. परिणामी रक्तटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ अरुण थोरात यांनी सद्यातरी राज्यात रक्ताचा पुरेसा साठा आहे. पण येत्या काळात रक्तटंचाई निर्माण होऊ शकते, असे मत व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लस घेण्याआगोदर रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.