मुंबई -कोरोना काळात रखडलेल्या भरती प्रक्रियेची सुरुवात करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र, या भरतीला मराठा नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. या नोकर भरतीमुळे हजारो तरुणांना दिलासा मिळणार आहे.
हजारो तरुणांना दिलासा -
या नोकर भरतीमुळे हजारो तरुणांना दिलासा मिळणार आहे. आरोग्य विभागातील 8 हजार 500 पद भरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. 17 हजार जागांपैकी 50 टक्के जागा म्हणजेच 8 हजार 500 पद भरण्यासाठी आरोग्य विभागाने जाहिरात दिली आहे. ग्रामविकास खात्यात असणारी आरोग्य विभागाची दहा हजार पदे, तसेच आरोग्य विभागाची सात हजार पदे अशी एकूण 17 हजार पद रिकामी आहेत. त्यापैकी 50 टक्के जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून सुटला नसल्याने होणाऱ्या या भरतीमुळे मराठा समाजावर अन्याय होणार असल्याचे मत मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.
28 फेब्रुवारीला होणार परीक्षा -
कोरोना काळात आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचारी तसेच विविध पदावर काम करणारे अधिकारी यांची कमतरता लक्षात घेता राज्य सरकारकडून सर्वात प्रथम आरोग्य विभागातील जागा भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 17 हजार जागांपैकी 50 टक्के जागा भरण्यात येणार आहे. यासाठी पुढच्या महिन्यातील 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार असून, एकाच दिवशी ही परीक्षा होईल. फेब्रुवारी 2019 साली महापोर्टलवरुन अर्ज केलेले उमेदवारही यासाठी पात्र असणार आहेत.