महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सामाजिक बांधिलकी.. मुंबई विद्यापीठात कम्युनिटी किचनला सुरुवात, प्रतिदिन करणार ५०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था - मुंबई विद्यापीठ

कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत मुंबई विद्यापीठाने महत्वाचे पाऊल उचलून शनिवारपासून कम्युनिटी किचनला सुरूवात केली आहे. विद्यानगरी संकुलातील उपहारगृहात विद्यापीठाने हे कम्युनिटी किचन सुरू केले असून विद्यापीठ शासनाच्या सहकार्यातून दररोज ५०० गरजू लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणार आहे.

Starting Community Kitchen at Mumbai University
मुंबई विद्यापीठात कम्युनिटी किचनला सुरुवात

By

Published : Apr 19, 2020, 11:23 AM IST

मुंबई - कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत मुंबई विद्यापीठाने महत्वाचे पाऊल उचलून शनिवारपासून कम्युनिटी किचनला सुरूवात केली आहे. कम्युनिटी किचन या संकल्पनेअंतर्गत विद्यापीठ शासनाच्या सहकार्यातून दररोज ५०० गरजू लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणार आहे.

विद्यानगरी संकुलातील उपहारगृहात विद्यापीठाने हे कम्युनिटी किचन सुरू केले असून पहिल्या दिवशी सांताकृझ परिसरातल्या गरजू, बेघर आणि मजुरांना अन्नाच्या पाकिटांचे वाटप केले.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संकटकालीन परिस्थिती उद्भवली आहे. सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशावेळी महाराष्ट्रात इतर राज्यातील अनेक स्थलांतरीत मजूर अडकून आहेत. अशा गरजू मजूरांना, बेघरांना आणि गरजवंताना तयार अन्नाची पाकिटे वाटपासंदर्भातील बाब विद्यापीठाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने सामाजिक बांधिलकेतून मुंबई विद्यापीठाने महाराष्ट्र शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कम्युनिटी किचन सुरू केले आहे. या सेवेसाठी जिल्हाधिकारी वांद्रे यांनी धान्यपुरवठा केला असून यासाठी उपजिल्हाधिकारी पंकज देवरे यांनी पुढाकार घेतला. तर चिंगारी शक्ती फाऊंडेशनच्या पिंकी राजगरिया आणि अजयकुमार जलान यांच्या तर्फे तेल, मसाले व फूड पॅकेट्स व इतर साहित्य मोफत पुरविले आहेत. ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे अध्यक्ष आशुतोष ठाकुर यांच्या सुनंदा गॅस एजन्सीने या सेवेसाठी गॅस सिलींडरची सोय करुन दिली आहे. विद्यापीठातील उपहार गृहात दररोज ५०० व्यक्तिंचे दोन वेळचे जेवण तयार होणार असून त्याच्या वितरणाची व्यवस्था जिल्हाधिकारी वांद्रे आणि विद्यापीठाच्या समन्वयातून केले जाणार आहे.

यासाठी जिल्हाधिकारी वांद्रे येथे विशेष कार्यासाठी नेमणूक झालेले विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक प्रसेनजीत खंडेराव यांची शासकीय कम्युनिटी किचनचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जोडीला विद्यापीठातील डॉ. विश्वभंर जाधव, डॉ. सुनिल अवचार, डॉ. रतीलाल रोहित यांच्यासह सुरक्षा अधिकारी बाळासाहेब खरात आणि काही शिक्षकेत्तर कर्मचारी यांची याकामी निवड करण्यात आली आहे.

ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या मुंबई विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकेतून अनेक समाजपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेल्या या संकटावर मात करण्यासाठी विद्यापीठाने शासनाच्या सहकार्यातून हे महत्वाचे कार्ये हाती घेतले असून समाज सेवेसाठी विद्यापीठाला ही एक संधी मिळाली असून त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी शासनाचे आभार मानले. गरजवंतासाठी दोन वेळच्या अन्नाची व्यवस्था करण्यासाठी याकामी इच्छुकांनी सढळहस्ते जीवनावश्यक वस्तू देणगी स्वरुपात देण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details