मुंबई -मुंबईमधील 95 टक्के लोकल ट्रेन सुरू आहेत. मात्र, त्यामधून सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा नाही. बेस्टच्या बसेसना प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. यामधून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी लोकल ट्रेन सुरू करा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती भाजप खासदार मनोज कोटक यांनी दिली.
हेही वाचा -वर्कफ्रॉम होम ट्रेंडचा बांधकाम क्षेत्राला 'असा'ही फायदा
रेल्वे सुरू करा -
संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक दोन टप्प्यात होत आहे. मुंबई रायगड आणि पुणे येथील 24 पैकी 12 खासदार या बैठकीला हजर होते. या बैठकीनंतर मनोज कोटक माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना मुंबईत 95 टक्के लोकल सुरू आहेत. मात्र, त्यामधून सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा नाही. बेस्टमधून गर्दी होते आहे. मुंबईकरांनी किती वाट बघायची, असा प्रश्न आपण उपस्थित केला. याला शिवसेनेच्या खासदारांनीही पाठिंबा दिल्याची माहिती कोटक यांनी दिली.
खासदारांनी एकत्र यावे -
राज्याला जीएसटीच्या माध्यमाने मिळणारा परतावा केंद्राकडून आणण्यासाठी खासदारांनी एकत्र यावे. कारशेड सारख्या प्रश्नावर राज्यातील खासदारांनी राज्य सरकारला समर्थन द्यावे. महाराष्ट्र, कर्नाटक सीमाप्रश्नी सर्व पक्षीय खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी खासदारांना केल्याची माहिती कोटक यांनी दिली.