मुंबई- केंद्र सरकारने परवानगी दिल्याने 4 मे पासून मद्य विक्रीची दुकाने उघडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, राज्यातील फक्त मद्य विक्रीचा परवाना असलेलेच दुकाने उघडले जाणार आहेत. त्यासाठी त्यांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला असून दुकानाबाहेर सोशल डिस्टंन्सिंग आणि लाॅकडाऊनचे नियम पाळणे बंधनकारक आहे. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
अटी शर्थीची पूर्तता करणारेच वाईन शॉप सुरू.. हेही वाचा-लाॅकडाऊन: दिव्यांग करतोय एका पायाने 400 किमीचा प्रवास...
दरम्यान, तब्बल 42 दिवसांनी वाईन शॉप उघडण्यात येतील म्हणून मुंबईत बऱ्याच परिसरात पहाटेपासून तळीरामांनी दारूच्या दुकानाबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र, तळीरामांच्या लांबच लांब रांगा दुकान उघडण्यापूर्वी लागल्यामुळे पोलिसांनी कारवाई करीत गर्दी पांगवली.
उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी स्पष्ट केले आहे की, वाईन शॉपच्या दुकानाबाहेर निर्माण होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे काम सध्या सुरू आहे.