महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंटेन्मेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे, पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना

कंटेन्मेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता, त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून आज आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तथा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या.

By

Published : Dec 28, 2020, 10:21 PM IST

Updated : Dec 29, 2020, 1:40 PM IST

tourist destinations sop
कंटेन्मेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे आणि पर्यटकांसाठी आदर्श कार्यप्रणाली जारी

मुंबई - कंटेन्मेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता, त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून आज आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तथा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना एसओपीनुसार कार्यवाही करण्याबाबत कळवले.

हेही वाचा -बीडीडीवासीय आंदोलनाच्या पवित्र्यात; आजचे उपोषण तूर्तास मागे

'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत २१ डिसेंबर २०२० रोजीच्या राज्य शासनाच्या सूचनांनुसार पर्यटनस्थळे आदी सुरू करण्यास संमती दिली आहे. पण, हे करताना कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने यासंदर्भातील विस्तृत आदर्श कार्यप्रणाली आज पर्यटन संचालनालयामार्फत जारी करण्यात आली. तथापी, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांनी पर्यटनस्थळांसंदर्भात काही निर्बंध, सूचना जारी केलेल्या असतील तर त्या बंधनकारक असतील, असे एसओपीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल पेमेंटवर भर द्या

पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी काय करावे आणि काय करू नये यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटनस्थळांवर मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आदींचे पालन करावे. गर्दी टाळण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्यास पर्यटनस्थळांचे ऑनलाइन तिकीट बुकींग करावे, पर्यटनस्थळांवर फक्त लक्षणे विरहित पर्यटकांनाच परवानगी असेल. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, १० वर्षाखालील मुले, गंभीर आजार असणाऱ्या व्यक्ती आदींनी घरीच थांबावे. पर्यटकांनी शक्यतो चलन वापरण्याचे टाळून डिजिटल पेमेंटवर भर द्यावा, अशा विविध सूचना पर्यटकांसाठी देण्यात आल्या आहेत.

योग्य ती काळजी घ्या

पर्यटनस्थळांवर कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घेण्याबाबत पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन आणि संबंधित विविध विभागांतील प्रतिनिधींची कोविड १९ पथके बनविण्यात यावी. या पथकांनी पर्यटनस्थळांवर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, पर्यटनस्थळांवर किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा यासंदर्भात निर्णय घ्यावा. समूहभेटी, गाईडेड टुर्स, सार्वजनिक कार्यक्रम, विशेष किंवा खाजगी कार्यक्रम आदींवर व्यवस्थापन नियंत्रण करू शकते.

मार्गदर्शक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करा

पर्यटनस्थळांवरील विविध आस्थापनांचे कर्मचारी यांनीही कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घ्यावयाची आहे. या शिवाय पर्यटनस्थळांची आगमन ठिकाणे, कॉमन एरियातील स्वच्छता, शौचालये, रेस्टॉरंटमधील भांड्यांची स्वच्छता आदी विविध विषयक मार्गदर्शन देण्यात आले आहे. तसेच, अन्नपदार्थ आणि पेयांचा पुरवठा करताना घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन देण्यात आले आहे. संबंधित आस्थापनांनी मार्गदर्शक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करावे, असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा -मुंबईतील युवतीने केला झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर बलात्काराचा आरोप

Last Updated : Dec 29, 2020, 1:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details