मुंबई -स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत कॉपीच्या तयारीत असलेल्या 11 परीक्षार्थींना पवई पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेले सर्व परीक्षार्थी हे पंजाब येथील रहिवासी आहेत. इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या साहाय्याने कॉपी करण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत कॉपीचा प्रयत्न करणाऱ्या 11 परीक्षार्थींना पवईत अटक प्रदीप कुमार ओम प्रकाश (26), राजू रामनिवास (20), अमन हरिकेश (23), दिनेश दलबीर (25), मोहित बिजेंदर (20), कुशकुमार पुलकुमार (24), नवीन सुभाषचंद्र (19), सुमित कुलदीप (21), राकेश ओमप्रकाश (23), सौरूभ सुभाष (21), नवीन रणधीर सिंग (23) अशी या अटक करण्यात आलेल्या परिक्षांर्थींची नावे आहे. हे सर्व परीक्षार्थी हरियाणा राज्यातील जिंद व हिसार येथील आहेत. त्यांना मंगळवारी न्यायालय समोर हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बुधवारी आराम आयटी पार्क ऑनलाइन परीक्षा केंद्र पवई येथे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेकरता पहिल्या सत्रात एकूण 1870 परीक्षार्थी आले होते. दुसऱ्या मजल्यावर हॉल नंबर 2 येथे एकूण 250 परीक्षार्थी परीक्षेस बसले होते. या परीक्षा केंद्रावरील परीक्षकाने परीक्षार्थीचे मेटल डिटेक्टरच्या साह्याने तपासणी केली असता, त्यापैकी एकूण 11 परीक्षार्थीकडे परीक्षेत कॉपी करण्यासाठी ब्लूटूथ कॉलर व कानामध्ये मायक्रोफोन मिळून आले. यावेळी परीक्षा केंद्रावर बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने परीक्षकांनी कॉपीच्या तयारीत आलेल्या 11 परीक्षार्थींना पवई पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
निरीक्षकांच्या उपस्थित 11 परीक्षार्थीची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 11 मायक्रोफोन ब्लूटूथ, कॉलर डिवाइस आढळून आले. परीक्षक केतन चव्हाण यांच्या कायदेशीर तक्रारी वरून पवई पोलीस ठाण्यात महाराष्ट्र विद्यापीठ व बोर्ड परीक्षा मधील गैरवर्तन प्रतिबंधक नियमानुसार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.