महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

थकीत वेतनासाठी एसटी कामगारांचे उद्या कुटुंबासह आक्रोश आंदोलन - आक्रोश आंदोलन

दिवाळी तोंडावर आली असून एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे उद्या एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह घराबाहेर बसून आक्रोश आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिली आहे.

st-workers-union-agitation-with-family-held-tomorrow-for-overdue-wages-in-mumbai
थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेचे उद्या कुटुंबासह आक्रोश आंदोलन

By

Published : Nov 8, 2020, 6:13 PM IST

मुंबई - कोरोना संकटाच्या काळात एसटी महामंडळातील कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. दिवाळी तोंडावर आली असून एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टपासून वेतन देण्यात आलेले नाही. रात्रंदिवस झटत राहणाऱ्या महामंडाळातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे उद्या एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह घराबाहेर बसून आक्रोश आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिली आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही, तर कर्मचारी संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) या संघटनेने दिला आहे.

आक्रोश आंदोलन -

एसटी कामगारांना थकीत वेतन, वाढीव महागाई भत्ता व सण उचल दिवाळीपूर्वी मिळावे, या मागणीसाठी २ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस या संघटनेच्यावतीने राज्यभर जिल्हाधिकारी, तहसीलदार व सर्व लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले. यासाठी संघटनेला राज्यभर प्रतिसाद मिळाला. यानंतरही एसटी कामगारांना थकीत वेतन, वाढीव महागाई भत्ता व सण उचल दिवाळीपूर्वी न मिळाल्यास ९ नोव्हेंबर रोजी एसटी कामगार आपल्या राहत्या घरासमोर आपल्या कुटुंबियांसह आक्रोश आंदोलन करतील. त्यानंतरही एसटी कामगारांना थकीत वेतन व इतर आर्थिक लाभ न मिळाल्यास तीव्र संघर्ष अटळ आहे, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी दिला आहे.

फौजदारी गुन्हा -

कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच सर्वसामान्य प्रवाशांची ने-आण केली. परंतु दिवाळी तोंडावर आली, तरी या कर्मचाऱ्यांना ऑगस्टपासून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून वेतन प्रदान अधिनियम, १९३६ या कायद्यानुसार हा फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतन द्यावे, अन्यथा महामंडळावर फौजदारीची कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) या संघटनेने कामगार आयुक्त डाॅ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली आहे.

संपाचा इशारा -

राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना वेतनाशिवाय बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांंना पगारच मिळालेला नाही, तर बोनसचे काय मिळणार, अशा संतप्त प्रतिक्रिया कर्मचारी व्यक्त करत आहे. कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला असून महामंडळाने सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी भावना संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी व्यक्त केली आहे. एसटीमधील एक लाख कर्मचाऱ्यांना दिवाळी आधी पगार दिला नाही, तर कर्मचारी संप करतील असा इशारा इंटकने दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details