मुंबई - आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि एसटीचे महसूल वाढविण्याकरिता एसटी महामंडळ मालवाहतूक क्षेत्रात उतरली आहे. आतापर्यत राज्यभरात एसटीच्या मालवाहूकीला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. एसटीच्या मालवाहतुक ट्रकांचे ब्रॅण्डिंग करण्याचा निर्णय परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी घेतला आहे. त्यासाठी मालवाहतूक सेवेचे ‘महाकार्गो’ असे नामकरण करण्यात आले आहे.
महामंडळाने दिले आदेश
परिवहन मंत्री यांनी महामंडळाच्या मालवाहतुकीच्या सेवेचे महाकार्गो असे ब्रँडिंग म्हणजेच नामकरण केलेले आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने त्यांच्या मालवाहतुकीच्या वाहनांची रंगसंगती बदलावी व त्या वाहनांवर ब्रँडनेम नमूद करण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून दिले आहे. सर्व वाहनांची रंगसंगती सारखी असावी. सर्व विभागांना मालवाहतुकीच्या वाहनाचे चित्र देण्यात येणार आहे. सर्व विभागांनी त्यांच्या विभागीय कार्यशाळेत मालवाहतुकीच्या वाहनाची रंगसंगती सोबत जोडलेल्या चित्रा नुसार व पाठवण्यात येणाऱ्या ड्रॉईंगनुसार करावी. ही कार्यवाही जास्तीत जास्त एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून सर्व विभागांना दिले आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले कि, एसटीच्या मालवाहतूक सेवेचे महाकार्गो असे ब्रँडिंग करण्यात येणार असून येत्या ८ दिवसात प्रक्रिया पूर्ण होईल.
५० कोटी रुपयांची कमाई
कोरोना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि एसटीचे महसूल वाढवण्याकरिता एसटी महामंडळाने 1 मे 2020 रोजी मालवाहतूकीच्या क्षेत्रात पदार्पण केले. प्रवासी गाड्यांमध्ये काही अंशतः बदल करून माल वाहतुकीसाठी वाहन तयार करण्यात आले होते. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात राज्यभरात 1 हजार 150 एसटीचे मालवाहतूक ट्रक आहेत. एसटीच्या मालवाहतूक विभागाने आतापर्यंत सरासरी ७५ हजार फेऱ्यातून सात लाख मेट्रिक टनाची माल वाहतूक केली आहे. त्यामधून एसटी महामंडळाला ५० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.