मुंबई -राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. शहरातील जनजीवन सुरळीत होत असताना रेल्वे बंद असल्याने प्रवाशांचा सर्व भार बेस्टच्या बस सेवेवर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या वाढत असल्याने एसटी महामंडळाच्या 250 बसेस बेस्ट उपक्रमाकडून भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. लवकरच या बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहेत. विशेष म्हणजे एसटीच्या गाड्यांवर वाहक आणि चालक दोन्ही महामंडळाचेच असणार होणार आहेत.
'बेस्ट' निर्णय, 'लालपरी'च्या 250 गाड्या मुंबईकरांसाठी धावणार - best bus mumbai
मुंबईतील प्रवाशांची वाढती संख्या पाहता बेस्टने एसटी महामंडळाकडे भाडेतत्त्वावर बसेसची मागणी केली होती. यानुसार बेस्टला 250 बस देण्यात येणार आहेत.
कोरोनाचा प्रसार होत असल्याने मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन असताना रेल्वे सेवा बंद केल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट बसेसद्वारे नियोजित स्थळी पोहचवले जात होते. यानंतर 8 जुनपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी बेस्ट बस धावू लागली आहे. मात्र, आजही लोकलचे दरवाजे सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंदच आहे. त्यामुळे लोकलचा प्रवासी बेस्ट बसेसकडे वळत असल्याने बेस्ट परिवहन विभागावर प्रवाशांचा भार येत आहे.
सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात 3 हजार 560 बसेस आहेत. त्यापैकी प्रवाशांच्या सेवेत रोज तीन हजार बसेस धावत आहेत. बेस्टची प्रवासी संख्या 16 लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे बेस्ट बसेसवर प्रवाशांचा वाढता भार पाहाता बेस्ट उपक्रमाने एसटी महामंडळाकडे भाडेतत्त्वावर बसेसची मागणी केली होती. या मागणीनुसार 250 गाड्या पुरवण्यात येणार आहेत. यापैकी काही गाड्या बेस्ट बस आगारात लवकरच रवाना करण्यात येतील, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली. यासाठी प्रति किलोमीटर 75 रुपये भाड्याने या बसेस घेण्यात येणार आहेत. त्यातूनच एसटी महामंडळाला इंधन, मेन्टेनन्स, ड्रायव्हर आणि कंडक्टरचा खर्च दिला जाणार आहे.
- गाड्यांचे नियोजन -
1) नाशिक आगार 30 बसेस
2) मनमाड आगार 20 बसेस
2) सटाणा आगार 25 बसेस
4) सिन्नर आगार 30 बसेस
5) इगतपुरी आगार 20 बसेस
6) लासलगाव आगार 20 बसेस
7) कळवण आगार 25 बसेस
8) पेठ आगार 15 बसेस
9) येवला आगार 10 बसेस
10) पिंपळगाव आगार 20 बसेस
11) मालेगाव आगार 10 बसेस
12) नांदगाव आगार 15 बसेस