मुंबई - कोरोनाच्या काळात मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या एसटी महामंडळाच्या 'महाकार्गो'ने अवघ्या वर्षभरात भरारी घेतली आहे. खासगी वाहतूक कंपन्यांच्या तुलनेत किफायतीशीर दर आणि सुरक्षित सेवा देणाऱ्या 'महाकार्गो'ने गेल्या वर्षभरात मालवाहतुकीसाठी १ कोटी ४० लाख किलोमीटरचा टप्पा पार करत महामंडळाच्या तिजोरीत ५६ कोटींचा महसूल जमा केला आहे.
'महाकार्गो' या नावाने हा ब्रँड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू केला. शासनाच्या निर्बंधामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तसेच इतर मालांच्या वाहतूकीवरही विपरित परिणाम झाला होता. या परिस्थितीवर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ मे २०२० पासून राज्यभरात अतिशय माफक दरात मालवाहतूक सेवा सुरू केली. खासगी वाहतुकीच्या तुलनेत किफायतशीर दर असल्याने एसटीचीही मालवाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली. जलद, खात्रीशीर आणि सुरक्षीत सेवा देणाऱ्या मालवाहतूकीला अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद ़मिळाला. मालवाहतूकीला मिळालेला हा प्रतिसाद पाहून महामंडळाने 'महाकार्गो' या नावाने हा ब्रँड विकसित केला आहे. त्यामुळे मालवाहतूकीचे ट्रक आता आकर्षक आणि नव्या रूपात 'महाकार्गो' या नावाने रस्त्यावर धावत आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत विभाग नियंत्रकांमार्फत मालवाहतुकीचे नियोजन केले जाते. या मालवाहतूकीवर महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून नियंत्रण ठेवले जात असून, मालवाहतुकीसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे.