मुंबई - राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले आहेत. आज (दि. 22 एप्रिल) रात्रीपासून नियमांची अंमलबजावणीला सुरुवात होईल. दरम्यान, एसटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार असल्याचे स्पष्टीकरण राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
एसटी अत्यावश्यक सेवेसाठीच
राज्यात लॉकडाऊन लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाला बंदी घातली आहे. आज (दि. 22 एप्रिल) रात्रीपासून 1 मेपर्यंत हे निर्बंध राहतील. एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल, याची चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल. पण, आता सरकारने जी नियमावली जाहीर केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेर दोन्ही ठिकाणी एसटी चालतील. पण, फक्त या एसटी बस अत्यावश्यक सेवेसाठीच चालतील, असे परब म्हणाले.
प्रवाशांच्या हातावर 14 दिवस विलगीकरणाचे शिक्के
एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जर नागरिक जाणार असतील, तर सरकारने दिलेल्या निर्देशनानुसार त्यांना हातावर शिक्के मारून 14 दिवस विलगीकरणात रहावे लागेल. मात्र, जिल्हाबाहेरील लोकांना येण्यासाठी किती दिवस आणि कशा पध्दतीने विलगीकरणात ठेवयाचे, त्यांच्या हातावर शिक्के मारायचे की नाहीत, या सगळ्या गोष्टींच्या निर्णयासाठी मंत्रालयात बैठक होणार असल्याचे परब यांनी सांगितले.
लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे
विरोधक काय टीका करतात, यापेक्षा लोकांचे प्राण वाचवणे आम्हाला जास्त गरजेचे आहे. त्यासाठी जे काही निर्बंध लावायचे आहेत, यामुळे जी काही रूग्णसंख्या वाढते आहे, ते घटवण्याचा हा प्रयत्न आहे. ब्रेक द चेन अंतर्गत हे काम सुरू आहे. त्यामुळे आता कोण काय बोलत यापेक्षा लोकांना कुठलाही त्रास होणार नाही, हे पाहणे महत्वाचे आहे, असे मंत्री परब यांनी सांगितले.
हेही वाचा -रेमडेसिवीरसह अत्यावश्यक साहित्याचे खरेदी-वितरण राज्यांकडे द्या; राज ठाकरेंचे मोदींना पत्र
हेही वाचा -'महाराष्ट्राच्या हितासाठी केंद्र सरकारच्या पायाही पडेल'