मुंबई -कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी स्वत: चा जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना सेवा देत आहेत. जागतिक कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, आज महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेकडून सेवा देणाऱ्या ५ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरामध्ये रेल्वे व इतर वाहने बंद करण्यात आली आहेत. यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय व महापालिका कर्मचाऱ्यांसाठी एसटी धावत आहे. आपल्या जीवाची आणि कुटुंबियांची पर्वा न करता एसटीचे चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व इतर स्टाफ कार्य करत आहेत.
सेवा देणारे वाहतूक नियंत्रक मधुकर कृष्णा तांबे, चालक सूर्यकांत अनंतराव नेवाळे, वाहक अशोक गोसावी, यांत्रिकी कर्मचारी दीपक खाशाबा जगदाळे आणि सुखदेव बाळू सांगळे या कर्मचाऱ्याचा सत्कार आज करण्यात आला. या प्रसंगी मुंबई सेंट्रल आगार शाखेकडून हॅन्डग्लोज आणि मास्कचे वाटप करण्यात आले.