मुंबई-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १९ मार्चपासूनच्या दहावी-बारावीचे सर्व पेपर पुढे ढकलेले आहेत. तर दुसरीकडे राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचे सर्व पेपर झाले असले तरी दहावीचा एक पेपर अद्यापही शिल्लक राहिला असल्याने या पेपरचे काय होणार, असा प्रश्न राज्यातील विद्यार्थ्यांपुढे पडला आहे.
दहावीच्या 'त्या' पेपरचे काय होणार? विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतरच शिक्षण मंडळाकडून दहावीच्या भूगोल या विषयाचा पेपर होईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २१ मार्च रोजी दहावीच्या शिल्लक राहिलेला पेपर पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. मात्र, आता हा पेपर कधी होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षाचे पेपर तपासण्याचे कामे ही काही ठिकाणी घरातून सुरू असले तरी अद्यापही हजारो पेपर आणि त्याचे गठ्ठे शिक्षण मंडळांच्या विभागीय कार्यालयांमध्ये पडून आहेत. १४ एप्रिलनंतर राज्यातील संचारबंदी शिथिल झाल्यास या पेपरच्या संदर्भात पुढील कार्यवाही सुरू होऊ शकेल, अशी अपेक्षा विविध शिक्षक संघटनानी व्यक्त केली आहे. मात्र ही संचारबंदी वाढल्यास दहावीच्या त्या शिल्लक राहिलेल्या पेपरसोबत दहावी-बारावीच्या पेपर तपासणीचे कामही लांबणीवर पडून त्याचा परिणाम निकाल उशिरा लागतील अशी शक्यता महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी व्यक्त केली आहे.
दहावी- बारावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांना कोरोनाचे हे संकट टळण्याची वाट पहावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यातील शिक्षक आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार आहेत. मात्र, कोरोनाचे संकट आणि त्याचाही विचार महत्वाचा असल्याचे घागस म्हणाले.