वंचित बहुजन आघाडीच्या बंद दरम्यानच्या घडामोडी -
- पुणे ग्रामीण भागात काही ठिकाणी बंदला सकाळच्या सत्रात चांगला प्रतिसाद, तर इंदापूरमध्ये बाजारपेठा बंद
- मुरबाड, शहापूरमधील बाजारपेठा बंद
- अंबरनाथ शहरात बंदचा परिणाम, तर उल्हासनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या वंचितच्या 30 कार्यकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात
- कल्याण-डोंबिवलीत बंदला थंड प्रतिसाद, तर काही ठिकाणी कडकडीत बंद
- भिवंडीत धामणकर नाका येथे रास्ता रोको करणाऱ्या वंचित आघाडीच्या 70 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- बारामती शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बारामती शहरातील हॉटेल्स, मॉल, दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत.
- वंचितच्या बंदला सोलापुरात हिंसक वळण, आंदोलकांनी सिटी बस फोडली तसेच सोलापुरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळाला आहे.
- बुलडाण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीसह 35 सामाजिक आणि राजकीय संघटनांनी शहरातून रॅली काढली, तर व्यापाऱ्यांनीही आपले उद्योग बंद ठेवले आहेत.
- धुळ्याच्या कुसुंबा येथे वंचित बहुजन आघाडीसह अन्य डाव्या विचारसरणीच्या पक्षांच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन तर महाराष्ट्र बंदला साक्री येथे संमिश्र प्रतिसाद
- वर्धेत वंचित बहुजन आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद
- अमरावती शहरात बंद समर्थकांनी इर्विन चौक परिसरात व्यापारी प्रतिष्ठाणावर दगडफेक केल्याने तणाव निर्माण तर पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
- अमरावतीमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक तर पोलिसांकडून लाठीचार्ज
- हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
- महाराष्ट्र बंदचा पुण्यात कमी प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून पुणे शहरातील वाहतूक सुरळीत आहे तर दुकानेही नेहमीप्रमाणे सुरू आहेत.
- आम्ही तगडा बंदोबस्त ठेवला आहे... नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच वाहतूक सुरळीत राहावी म्हणून आम्ही प्रयत्नशील... डीसीपी झोन 7 अखिलेश कुमार सिंह यांची माहिती..
- रमाबाई कॉलनी जवळून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत
- दुकाने आणि रिक्षा सेवा बंद तर वंचित आणि भारिपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
- कुर्ल्यात बेस्ट बसवर दगडफेक, बसचालक गंभीर जखमी
- महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या घाटकोपररमाबाई कॉलनीत कडकडीत बंद
मुंबई - वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर आज (शुक्रवारी) सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर निदर्शने केली आहेत. काही भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे तर काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले आहे. सोलापूर, कुर्ला व अमरावती येथे बंदला हिंसक वळण लागले असून, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच ठिकठिकाणी पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे. बुलडाणा व हिंगोलीमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर काही वेळ आंदोलकांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून मार्ग मोकळा केला. त्यामुळे रमाबाई आंबेडकरनगर मधील बहुतांश दुकाने बंद आहेत. तर कुर्ल्यात बेस्ट बसवर अज्ञाताने दगडफेक केल्यामुळे बस चालक गंभीर जखमी झाला आहे.