मुंबई : मुंबईमध्ये दीपावली (Diwali Celebration) हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. हा सण साजरा करताना मोठ्या प्रमाणात आगी लागण्याच्या घटना घडतात. यासाठी दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता (dont make these mistakes) बाळगावी. विशेषतः फटाके फोडताना लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी. आग लागण्यासारख्या घटना घडल्यास तात्काळ मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ क्रमांक किंवा पालिकेच्या नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ वर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून (BMC appeals to Mumbaikars) करण्यात आले आहे.
दीपावली सणाचा आनंद द्विगुणीत करा : दरवर्षी उत्साहात दीपावली सण साजरा करतात. या मंगलमय प्रसंगी दीपोत्सव साजरा करीत असतांना फटाक्यांची आतिषबाजी, दिव्यांची सजावट तसेच विद्युत रोषणाई केली जाते. काहीवेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटनांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याकरीता योग्य काळजी घेतल्यास दीपावली सणाचा आनंद द्विगुणीत होईल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.