मुंबई- विधानसभा निडणुकांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे राजकीय नेते जिवाचे रान करताना दिसून येत आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे हे राज्यातील नेते मैदानात उतरले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह या महत्त्वाच्या नेत्यांसह केंद्रातले भाजपचे अनेक मंत्री, नेते राज्याच्या प्रचाराच उतरले आहेत. वयाच्या ऐंशीतही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचार करत आहेत. तर, दुसरीकडे सोनिया गांधी यांचे काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नाव आहे. तरीही त्यांनी राज्यात एकही सभा घेतली नाही. त्यामुळे सोनियांनी जबाबदारी राज्याच्या नेतृत्वावर सोपवली का? की त्यांनी माघार घेतली? किंवा आता महाराष्ट्र त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाही का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
हेही वाचा - 'गोळ्या झाडण्याच्या गोष्टी करणारा, विकासकामे काय करणार?'
येत्या 21 ऑक्टोबरला राज्यात मतदान तर, 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यासाठीचा प्रचार 19 तारखेला संपणार आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. पंतप्रधानांसह केंद्रातले अनेक नेते महाराष्ट्रात येवून प्रचार करत आहेत. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवारही पायाला भिंगरी लावल्यासारखे राज्यात प्रचार करत आहेत, असे असतानाही काँग्रेसचे हायकमांड नेते मात्र कुठेही प्रचारात दिसत नाहीत.
हेही वाचा - मी पहिल्याच दिवशी सेनेचा राजीनामा दिला - तृप्ती सावंत
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची एकही सभा किंवा साधी रॅलीही महाराष्ट्रात झालेली नाही. राहुल गांधी यांनीही प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सभा घेतली. त्यामुळे खरच काँग्रेसला आता महाराष्ट्राची निवडणूक महत्त्वाची वाटत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हरियाणा विधानसभेची निवडणुकही याचवेळी होत आहे. तिथेही सोनिया गांधी यांची एकही सभा झालेली नाही. तिथे एक सभा आयोजित केली होती. मात्र, तिही रद्द झाली आहे. हरियाणात मागील निवडणुकीत काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या तर, महाराष्ट्रात 42 जागावर काँग्रेस विजयी झाले होते. त्यामुळे आकडेवारीच्या गणितात हरियाणापेक्षा महाराष्ट्रात काँग्रेसची बरी स्थिती दिसत आहे. तरीही काँग्रेसचे राज्यात दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे.