मुंबई - सध्या जगभर ‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराने जनजीवन प्रभावित झाले आहे. भारतातही आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात याचा शिरकाव झालेला आहे. देशामध्ये हा आजार तिसऱ्या टप्प्यात पोहचला तर काय होईल? यांचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी कोरोना आजाराबाबत पत्रक काढले आहे. खबरदारीच्या उपाययोजनांसाठी घ्यावयाची काळजीबाबत जाहीर आवाहन त्यात त्यांनी केले आहे. पाटील यांनी सरकारने आणि जनतेने काही महत्त्वाच्या बाबी करावयास सांगितल्या आहेत. तसेच कोरोनाबाधीत चार देश चीन, द. कोरिया, तैवान, सिंगापूर यांनी कोरोनावर आळा घालण्याचा कसा प्रयत्न केला याबाबत सांगितले आहे.
कोरोना साथीला तोंड देण्यासाठी जन आरोग्य अभियानचे आवाहन !
चीनमध्ये डिसेंबरमध्ये सुरू झालेली कोरोना ताप, खोकला, न्युमोनियाची साथ फारच वेगाने जगभर पसरली आहे. तीन महिन्यात दीडशेहून अधिक देशांमध्ये दोन लाखाहून जास्त लोक या साथीने आजारी पडून सहा हजारपेक्षा जास्त दगावले आहेत. सर्व देशांचा अनुभव सांगतो की ही अतिशयच वेगाने पसरणारी, असाधारण साथ आहे व त्यामुळे असाधारण, खास पाउले उचलायला हवीत.
चीन या देशातून कोरोनाच उगम आणि तेथील काही निरीक्षणे -
चीनचा अनुभव सांगतो की कोरडा खोकला, जोरदार ताप व कधी कधी श्वास लागणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. या आजाराचे ‘कोव्हिड-१९’ (COVID 19) हे विषाणू मारणारे औषध अजून सापडलेले नाही. नवीन औषध सापडून ते बाजारात यायला अनेक महिने लागतील. मात्र आपले शरीरच या विषाणूंवर विजय मिळवते. कोरोनाबाधितांपैकी ८० % रुग्णांना सौम्य आजार होतो व तापाची साधी परासिटमॉल गोळी, कोरड्या खोकल्या वर साधे औषध, विश्रांती याने तो ७ ते १४ दिवसांमध्ये बरा होतो. १५% रुग्ण गंभीर होतात; त्यांना करोना, न्युमोनिया होतो. त्याना इस्पितळात आणि त्यातील काही जणांना आय. सी. यू मध्ये उपचार करावे लागतात. एकूण रुग्णांपैकी सुमारे १ ते ३ टक्के रुग्ण दगावतात. ६० वर्षाच्या वरील रुग्ण, तसेच ज्यांना दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे आजार असतील त्यांना तीव्र आजार होणे, दगावणे याचा धोका असतो. चीनमध्ये ९ वर्षाखालील कोणीही दगावले नाही आणि तरुण, निरोगी व्यक्तींमध्ये दगावण्याचे प्रमाण फारच कमी आहे. एकंदरीत स्वाईन फ्लू सारखा हा आजार आहे, मात्र त्याची संसर्गशीलता खूपच जास्त आहे.
कोरोनाबाधील इतर देशातील तिन्ही टप्पे आणि आकडेवारीचे गणित -
निरनिराळ्या देशांचा अनुभव सांगतो की परदेशातून आयात झालेली लागण (आयात-जन्य लागण ) हा या साथीचा पहिला टप्पा आहे. अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना झालेली लागण हा या साथीचा दुसरा टप्पा. तो ओलांडून इथल्याच समाजात, आपापसातील संपर्कातून पसरलेली लागण (समाज-जन्य लागण ) या तिस-या टप्प्यात या साथीने प्रवेश केला की अतिशय वेगाने ही साथ पसरते. नोंदलेल्या रुग्णांची संख्या पहिल्या दोन-तीन आठवड्यांनंतर ५०-१०० च्या पुढे गेली की नंतरच्या आठवड्यामध्ये ती फारच वेगाने वाढू शकते. उदा. अमेरिकेत ३ मार्च ते १४ मार्च या ११ दिवसात रुग्णांची ६४ वरून २८ पट म्हणजे १६७८ झाली ! इटलीत २३ फेब्रुवारी ते ५ मार्च या ११ दिवसात ती ७६ वरून ४० पट म्हणजे ३०४८ झाली ! तर १५ मार्च ती २५ हजार झाली ! चीन, इटली इराण इ. काही देशात हे फारच वेगाने झाले. पण इतरही अनेक देशांमध्येही साथीने तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे.
इटलीत आपल्यापेक्षा हॉस्पिटल्सची क्षमता (दर लाख लोकांमागे) कित्येक पट आहे. पण तिथे आजच हॉस्पिटल, आय. सी. यु. मधील खाटा अपु-या पडत आहेत. त्यामुळे भारतात इटली प्रमाणे या साथीचा समाज-जन्य प्रसार वेगाने झाला तर फारच अवघड होईल. भारतात ३० जानेवारीला पहिल्या केसची नोंद झाली आणि १५ मार्च पर्यंत १०७ जण आजारी व ३ मृत्यू अशी नोंद झाली आहे.
आपण तिस-या टप्प्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत !
भारतात ही साथ तिसऱ्या टप्प्यात शिरून एकदम वेगाने लाखो लोकांपर्यंत पसरली तर त्यापैकी सुमारे १०% गंभीर रुग्णांना दाखल करण्या इतकी इस्पितळे, त्यात पुरेशा आय. सी. यू. खाटा हे सर्व आपल्याकडे नाहीय. एका जिल्ह्यात २० लाख लोकसंख्या असते. त्यातील ३० वर्षावरील लोकसंख्या १० लाख असते. त्यातील एक चतुर्थांश म्हणजे २.५ लाख लोकाना कोरोना आजार झाला तर त्यातील १०% म्हणजे २५ हजार लोकांना इस्पितळात ठेवावे लागेल. याच्या १०% सुद्धा खाटा सरकारी रुग्णालयांमध्ये आज नाहीयेत ! दुसरे म्हणजे बहुतांश जनतेला हॉस्पिटलमधील उपचार मोफत मिळाले तरच ते हे उपचार घेऊ शकतील. पण गेल्या ४० वर्षातील खासगीकरणाच्या धोरणामुळे आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची पडझड झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे काय होणार हा मोठा यक्ष प्रश्न आहे.
अर्थात या साथीचा घाबरून जाऊन धसका न घेता ही साथ जास्त पसरणार नाही यासाठी आटोकाट प्रयत्न करायची गरज आहे. हे लक्षात घेता नागरिकांनी, आरोग्य व्यवस्थेने आणि सरकारने कोणती पाउले उचलायला हवी हे आपण पाहू या. पैकी नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर घ्यायच्या काळजी बाबत शेवटी दिलेली चौकट पाहावी.
सरकारचे धोरण -
या साथीला तोंड देण्यासाठी सरकारने लगेच जी पाउले उचलली त्यांचे आम्ही स्वागत करत असल्याचे अंनिसचे अविनाश पाटील यांनी म्हटले आहे.
कोरोनाग्रस्त देशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावरच छाननी लगेच सुरु करणे; त्यांनी १४ दिवस घरीच थांबावे आणि इतर सर्वांपासून अलग राहावे असा सल्ला त्यांना देणे; त्याचा पाठपुरावा करून त्यांच्या पैकी ज्यांना नंतर ताप, खोकला आला त्यांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करणे; ज्यांच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला त्यांना इतरांपासून अलग ठेवण्यासाठी त्यांना खास कक्षामध्ये दाखल करून सरकारी खर्चाने गरजेप्रमाणे उपचार करणे; त्यांच्या संपर्कात आलेल्यांना भेटून त्यांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करणे इ. सर्व गोष्टी सरकारी आरोग्य व्यवस्थेने नेटाने केल्या आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींपासून ही साथ पसरण्याला चांगला आळा बसला आहे हे स्वागतार्ह आहे. शाळा, महाविद्यालये पासून अधिकाधिक प्रमाणात सार्वजनिक संस्था/ आस्थापने ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचा आदेश देणे हेही स्वागतार्ह आहे. पुण्यासारख्या ठिकाणी दुकानदार, हॉटेल मालक यांनी आपणहून तीन दिवस व्यवसाय बंद करायचे ठरवले तेही स्वागतार्ह आहे.
पण हे पुरेसे नाही. जगात फक्त चारच देशांमध्ये या साथीला रोखण्यात सध्या यश आले आहे. चीन, द. कोरिया, तैवान, सिंगापूर. त्यांनी हे यश कसे मिळवले हे समजावून घेऊन ताबडतोबीने आपण आणखी काही सुयोग्य पाउले टाकायला हवी. या चार देशांमध्ये खालील दोन मुख्य पाउले पूर्ण ताकदीने उचलली आहेत की जी इतर देशांमध्येही काही प्रमाणात उचलली गेली आहेत.
मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घशातील स्त्रावाची तपासणी -
एक तर चीन, द. कोरिया, तैवान, सिंगापूर या देशांमध्ये कोरोनाची लागण कोणाला झाली आहे का ते शोधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घशातील स्त्रावाची तपासणी केली जाते. ज्यांची तपासणी केली जाते असा एक गट म्हणजे कोरोनाबाधित देशांमधून, कोरोनाबाधित प्रदेशातून आलेल्या व्यक्ती. कोरोनाग्रस्त देशातून या देशांमध्ये आलेल्या अशा लोकांना ताप आहे का ते विमानतळावर बघितले जाते. ताप, खोकला असेल तर त्यांना वेगळे काढून त्यांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करून त्याचा रिपोर्ट नेगेटीव्ह आला तरच त्यांना घरी जाऊ दिले जाते. बाकीच्या अशा बाधित देशातील सर्व प्रवाशांचा १४ दिवस पाठपुरावा केला जातो. त्यापैकी कोणाला नंतर खोकला-ताप आला तर त्यांचीही तपासणी केली जाते. ती पॉझिटीव्ह आली तर त्यांना इतरांपासून वेगळे करून १४ दिवसात विलगीकरण कक्षात ठेवले जाते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाते व ज्यांचा रिपोर्ट पोझिटीव्ह येईल त्यांनाही १४ दिवस विलगीकरण (Isolation) कक्षात ठेवले जाते. असे केल्यामुळे सर्व आयात-जन्य केसेस हुडकल्या जातात. भारतातही थोड्या फरकाने अशाच प्रकारे आयात-जन्य केसेस हुडकल्या जाऊन त्यांच्यावर उपचार करून त्यांच्यापासून होणारा प्रसार रोखला जातो आहे.
याशिवाय या चार देशांमध्ये आणखी एक गोष्ट केली जाते. खोकला-ताप असलेल्या सर्व रुग्णांच्या घशातील स्त्रावाची घरोघर जाऊन तपासणी केली जाते. ती पोझिटीव्ह आली तर त्यांच्या संपर्कातील सर्वांची तपासणी केली जाते. तसेच इतर निकष वापरून इतर अनेक नागरिकांची तपासणी केली जाते. त्यामुळे फक्त आयात-जन्य करोना-रुग्णच नव्हे तर स्थानिक, समाज-जन्य रुग्णही हुडकले जातात. त्यांच्यावर उपचार केले जातात आणि त्याना १४ दिवसात विलगीकरण कक्षात ठेवले जाते.
भारतात मात्र आतापर्यंत फक्त आयात-जन्य रुग्ण हुडकून त्यांच्यावर उपचार व त्यांचे विलगीकरणा एवढेच केले जाते. या धोरणात दोन तृटी आहेत.
भारताच्या धोरणातील त्रूटी -
एक तर परदेशातून येणारे काही रुग्ण असे असतात की ज्यांना विमानातून उतरताना अजून ताप, खोकला सुरु झालेला नसतो. नंतर दोन, चार दिवसात येऊ लागतो. तो पर्यंत आपल्याला करोनाची लागण झाली आहे हे त्या रुग्णालाही माहीत नसते. खोकला, ताप सुरु झाल्याची माहिती त्यातील बहुसंख्य रुग्ण आपणहून आरोग्य अधिका-याना देत नाहीत; त्यातील अनेकांच्या लक्षातही येत नाही की आपल्याला करोना आजार झाला आहे. त्यातील बहुसंख्य जणांना सौम्य आजार असल्याने ते नेहेमीसारखे समाजात वावरतात आणि ते बरे होईपर्यंत त्यांच्या नकळत हे विषाणू दोन आठवडे पसरत राहतात. या आयात रुग्णांपासून ज्यांना सौम्य करोना अाजार होतो त्यानाही माहीत नसते की आपल्याला करोना-आजार झाला आहे. त्यामुळे तेही न कळत करोना विषाणू पसरवत राहतात. करोना विषाणूचा प्रसार होण्याची अशी साखळी चालू राहते. या प्रक्रियेला करोनाचा ‘कम्युनिटी स्प्रेड’ म्हणतात. सर्वच देशात ‘कम्युनिटी स्प्रेड’ होतो.