मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी नियमित सुनावणी 3 डिसेंबर पासून मुंबईतील एनआयए न्यायालयामध्ये सुरू झालेली आहे. 2008 मध्ये झालेल्या या स्फोटासंदर्भात आतापर्यंत 475 साक्षीदार असून 300 साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी आहे. यामुळे दैनंदिन सुनावणीसाठी या प्रकरणातील सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने अगोदरच दिले होते. मात्र, गुरुवारच्या सुनावणीत या प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर उदयभान द्विवेदी व सुधाकर चतुर्वेदी हे आरोपी अनुपस्थित राहिले आहेत. सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे निर्देश असतानाही अनुपस्थित राहिल्याने या सर्वांना न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आरोपींना 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश
2008 मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात गेल्या 12 वर्षांपासून विशेष न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भात 3 डिसेंबार 2020 पासून नियमित सुनावणी सुरू होत आहे. या नियमित सुनावणीसाठी या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर दिवेदी, अजय राहीलकर व संदीप डांगे यांना अटक करण्यात आली होती. 3 डिसेंबरला सुनावणीला गैरहजर राहिल्याने विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.