मुंबई- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'क्यार' व 'महा' या दोन चक्रीवादळामुळे मच्छिमारांना मासेमारी न करता आल्याने नुकसान झाले होते. या नुकसानीबद्दल ६५ कोटी १७ लाख इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
रापणकार संघाचे सभासद असणाऱ्यांना प्रति सभासद १० हजार रुपये, असे ४ हजार १७१ सभासदांना ४ कोटी १६ लाख, बिगर यांत्रिक नौकाधारकांना प्रत्येकी २० हजार प्रमाणे १ हजार ५६४ नौकाधारकांना ३ कोटी १२ लाख ८० हजार, १-२ सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे ४ हजार ६४१ जणांना ९ कोटी २८ लाख २० हजार, ३-४ सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी ३० हजार प्रमाणे १ हजार ५२६ जणांना ४ कोटी ५७ लाख ८० हजार, ६ सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी ३० हजार रुपये प्रमाणे ७ हजार ६७१ जणांना २३ कोटी १ लाख ३० हजार रुपये, लहान मासळी विक्रेता मच्छिमारांना ५० लि. क्षमतेच्या २ शितपेट्या पुरवठा प्रत्येकी ३ हजार प्रमाणे ३५ हजार जणांना २१ कोटी रुपये देण्यात येतील. याचा लाभ ५४ हजार ५७३ मच्छिमारांना मिळेल. हा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये (डीबीटी) जमा करण्यात येईल.
मालेगाव तालुक्यात कृषी विज्ञान संकूल
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका येथील मौजे काष्टी येथे कृषी विज्ञान संकूल देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संकुलात शासकीय कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यात येईल.