मुंबई :राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न प्रलंबित असताना आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख समोर आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नेते आणि प्रतोद भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तार आता 1 फेब्रुवारी नंतर होईल असा दावा ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांमध्ये मोजक्याच महामंडळ आणि समित्यावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळवरील सदस्यांच्या नियुक्ती आणि समितांवरील सदस्यांच्या नियुक्ती लवकरच केल्या जातील याबाबत सर्व चर्चा झाली असून, तयारी झाली आहे. केवळ या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालासाठी काही बाबी थांबल्या होत्या असेही गोगावले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगात आमचाच विजय :निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सत्ता संघर्षात आमच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा विजय होईल. कारण बहुतांश पदाधिकारी हे आमच्या पक्षात आहेत. आमदार खासदारांचे आम्हाला पाठबळ आहे. तसेच, सदस्यांच्या कागदपत्रांची पूर्तता ही आम्ही करीत आहोत. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला नक्की मिळेल असा दावाही भरत गोगावले यांनी केला आहे. जर आमच्या विरोधात आयोगाचा निकाल गेला तरीही परिस्थिती फारशी बदलणार नाही त्याबाबत आमच्या पक्षाचे नेते आणि पदाधिकारी योग्य निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले आहे.