मुंबई : MLA Disqualification Case : शिवसेना पक्षातील आमदार अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले कागदपत्र आमच्याकडे सादर करण्याबाबतचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. त्यासोबतच पुढील सुनावणी 26 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
सहा समूहाच्या माध्यमातून होणार सुनावणी : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या 34 याचिका दाखल झाल्या आहेत. सर्व याचिका एकत्रितपणे सुनावणीसाठी घेण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. तसेच 34 याचिका एकत्र केल्या जाणार आहेत. 6 समुहाच्या माध्यमातून त्या मांडल्या जाणार आहेत. शिवसेनेतील दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले कागदपत्र विधानसभा अध्यक्षांसमोर सादर करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिज्ञापत्रे ग्राह्य धरण्यात आली आहेत.
सहा गटाच्या माध्यमातून सुनावणी : एकत्रित सुनावणीबाबत जो विषय होता त्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सहा गट तयार केले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका या सहा गटात विभागून सहा गटाच्या माध्यमातून त्यांची सुनावणी होणार आहे. एकप्रकारे ते एकत्रित आहेत. मात्र, सहा गटांमधून सुनावणी होणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांचे वकील प्रवीण टेंभेकर यांनी दिली.