मुंबई -विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेसकडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या १५ हून अधिक सभा होणार आहेत. यामध्ये राहुल गांधीच्या सर्वाधिक सभा होणार असून मुंबई वगळता राज्यात सहा ठिकाणी राहुल गांधी यांच्या सभा घेण्यासाठी काँग्रेसने तयारी केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ दहा दिवसांचा कालावधी असल्याने प्रत्येक विभागात दोन किंवा तीन सभांना सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी असणार आहेत. तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससोबत संयुक्त सभा घेतल्या जाणार असून त्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देशातील इतर राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत. ज्या राज्यांमध्ये निवडणुका नाहीत अशा राज्यांमधून काँग्रेसचे १०० हून अधिक नेते विविध मतदारसंघात सभा घेणार आहेत. तर ज्या ठिकाणी इतर राज्यातील मतदार अधिक आहेत अशा ठिकाणी त्या राज्यातील नेत्यांना कार्यक्रम देण्यात आला आहे. यासाठीची एक मोठी यादी प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत तयार झाली असून येत्या दोनच दिवसात हे नेते राज्यात प्रचाराला सुरूवात करणार आहेत.